नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये ११ जणांचा बळी

नाशिक शहरासह जिल्ह्यात तीन अपघातात सात, पाण्यात बुडून तीन आणि सर्पदंशाने एक आदी वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये ११ जणांचा बळी
नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये ११ जणांचा बळी
Published on: 

लासलगाव : नाशिक शहरासह जिल्ह्यात तीन अपघातात सात, पाण्यात बुडून तीन आणि सर्पदंशाने एक आदी वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बाप लेकासह एका दांपत्याचा आणि परराज्यातील तिघांचा समावेश आहे.

नाशिकमधील संजय सोनवणे वाडीवऱ्हे परिसरातील डोहात पोहत होते. वडिलांना पोहताना पाहून त्यांचा मुलगा श्रीलाही पाण्यात उतरण्याचा मोह आवरला नाही. तो पाण्यात बुडू लागला. मदतीसाठी ओरडणाऱ्या पोटच्या गोळ्याला पाहून संजय सोनवणे यांच्या काळजाचा ठोका चुकला. मुलाला वाचवण्याच्या धडपडीत डोहातील पाण्याच्या वेगामुळे त्यांचा श्वास कोंडला. त्यात संजय सोनवणे यांचा मृत्यू झाला तर मुलगा श्री पाण्याच्या वेगात वाहून गेला. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह पाण्यात आढळला.

खदाणीमधील पाण्यात युवक बुडाला

सिडको परिसरातील खाणीत गणपती विसर्जनासाठी गेलेले रिक्षाचालक संदीप खनपटे(२३) याचा पाण्यात बुडून दुर्दैव मृत्यू झाला. खदानीच्या तळाशी मोठ्या प्रमाणात गाळ असल्यामुळे तो पाण्याबाहेर येऊ शकला नाही

दाम्पत्याचा अपघात

नाशिक शहरातील भिसे मळा परिसरातील हरिशंकर जाधव आणि संध्या जाधव हे दांपत्य वाहनातून प्रवास करत होते. उमराळे गावाजवळ त्यांच्या वाहनाला धडक बसून अपघात झाला. या दुर्घटनेत दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला.

दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे निमोण मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात योगेश सोपान ठाकरे (२७) आणि रामदास रावसाहेब माळी (३२) यांचा मृत्यू झाला.

सर्पदंश मृत्यू

नाशिक तालुक्यातील सिद्धपिंपरी येथील शेतकरी विजय ढिकले हे आपल्या शेतात मध्यरात्री पाणी भरत असताना त्यांना विषारी सापाने दंश केला. त्यांचा मृत्यू झाला.

दोन ट्रकची धडक, तीन ठार

मनमाडकडून मालेगावकडे जाताना चांदवड तालुक्यातील कानडगाव शिवारात ओव्हरटेक करत असताना दोन ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, झाला तर एका गंभीर जखमीची प्रकृती चिंताजनक आहे. यात समी, अब्दुलरहीम बोहारी, वसीम अक्रम खा यांचा जागीच मृत्यू झाला असून जखमी आयान शेख, शोएब खान या जखमीला पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलवले आहे. मृतांना क्रेनच्या साह्याने गाडीच्या बाहेर काढून चांदवड ग्रामीण रुग्णालय येथे ठेवले आहे. अपघातामुळे राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in