TET परीक्षा पेपरफुटीप्रकरणी मुख्य सूत्रधारासह ११ जणांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

रॅकेटमार्फत विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच पेपर पुरवण्याचे आश्वासन देऊन मूळ शैक्षणिक कागदपत्रे आणि रोख रक्कम घेत फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो
Published on

कोल्हापूर : टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपरफुटी रॅकेट प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपासाची गती वाढवून मुख्य सूत्रधारासह आणखी ११ जणांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता १८ वर पोहोचली आहे. या रॅकेटमार्फत विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच पेपर पुरवण्याचे आश्वासन देऊन मूळ शैक्षणिक कागदपत्रे आणि रोख रक्कम घेत फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी प्राप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने मुरगुड पोलीस ठाण्याच्या मदतीने २३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सोनगे (ता. कागल) येथील शिवकृपा फर्निचर मॉलवर छापा टाकला. त्यावेळी सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले, तर मुख्य आरोपी महेश भगवान गायकवाड हा फरार झाला होता.

या घटनेबाबत मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींची २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. पोलीस कोठडीत मिळालेल्या पुराव्यांवरून आणि तपासाच्या आधारे आणखी ११ जणांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यात रोहित पांडुरंग सावंत, अभिजीत विष्णू पाटील, संदीप भगवान गायकवाड, अमोल पांडुरंग जरग, स्वप्नील शंकर पोवार, रणधीर तुकाराम शेवाळे, तेजस दीपक मुळीक, प्रणय नवनाथ सुतार, संदीप शिवाजी चव्हाण, श्रीकांत नथुराम चव्हाण, तसेच मुख्य आरोपी महेश गायकवाड यांचा समावेश आहे.

या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे, मुरगुड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे तसेच पोलीस कर्मचारी व सायबर शाखेचे अधिकारी यांचे विशेष योगदान आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी आरोपींचा सहभाग उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in