११ जागा अन् १२ उमेदवार... विधानपरिषद निवडणूकीमध्ये कुणाचा होणार गेम?

विधानपरिषद निवडणूकीत क्रॉस व्होटिंगच्या शक्यतेमुळं राजकीय पक्षांची धाकधूक वाढली.
११ जागा अन् १२ उमेदवार... विधानपरिषद निवडणूकीमध्ये कुणाचा होणार गेम?

येत्या १२ जुलै रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून १२ उमेदवार रिंगणात आहेत. विधासभेतील आमदारांची संख्या पाहता एका उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळं आपापल्या उमेदवारांसाठी मतांची जुळवाजुळव करण्यात महायुती आणि महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. क्रॉस वोटींगची शक्यता असल्यानं सर्वच पक्षांची धाकधूक वाढली आहे.

११ जागा १२ उमेदवार...

येत्या १२ जुलै रोजी विधान परिषदेच्या ११ रिक्त जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये भाजपचे ५, शिवसेना शिंदे गटाचे २, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे २, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाचा प्रत्येकी १ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहे.

भाजपचे उमेदवार-

  1. पंकजा मुंडे

  2. परिणय फुके

  3. अमित बोरखे

  4. योगेश टिळेकर

  5. सदाभाऊ खोत

शिवसेना (शिंदे गट)-

  1. भावना गवळी

  2. कृपाल तुमणे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)-

  1. राजेश विटेकर

  2. शिवाजीराव गर्जे

काँग्रेस-

  1. डॉ. प्रज्ञा राजीव सातव

शेतकरी कामगार पक्ष-

  1. जयंत पाटील

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-

  1. मिलिंद नार्वेकर

कशी होणार निवड:

विधानसभेतील आमदारांमधून विधानपरिषदेच्या सदस्यांची निवड होणार आहे. विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या भागिले विधानपरिषदेतील रिक्त जागांची संख्या अधिक १ या पद्धतीनं कोटा ठरतो. राज्यात विधानसभेच्या एकूण जागा २८८ आहेत. पण, परंतु काही आमदारांनी विविध कारणांमुळं राजीनामे दिल्यामुळं हे संख्याबळ २७४ वर आलं आहे. त्यामुळं विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी उमेदवाराला २३ (२४४ भागिले ११ अधिक १=२२.८३) मतं आवश्यक आहेत. मतमोजणीत २३ मतांचा कोटा पूर्ण केलेले उमेदवार पहिल्याच फेरीत विजयी होतील. तसं न झाल्यास दुसऱ्या पसंतीची आणि आवश्यकता भासल्यास तिसऱ्या पसंतीची मतं मोजली जातील आणि त्यातून निकाल ठरणार आहे.

कोणत्या पक्षाकडे किती संख्याबळ-

थोडक्यात महायुतीकडे २०२ आमदार असून त्यांचे ९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत, तर महाविकास आघाडीचे ६६ आमदार आहेत. ६ आमदार तटस्थ आहेत. सध्या भाजपकडं १०३ आमदार असून अपक्ष आणि इतर मिळून ११६ आमदार आहेत. त्यामुळं भाजपचे सर्व ५ उमेदवार निवडून येऊ शकतात. शिवसेना शिंदे गटाचे ३७ आमदार असून ६ अपक्ष तसेच २ बच्चू कडूंचे आमदार अशा एकूण ४५ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यांना एका मताची गरज आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ४० उमेदवार असून त्यांना दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी ३ मतांची गरज आहे.

तिकडे महाविकास आघाडीच्या बाबतीत काँग्रेसकडे सर्वाधिक ३७ आमदार आहेत. त्यामुळं काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकतो. आणि १४ मतं शिल्लक राहतील. ठाकरे गटाचा १ उमेदवार असून त्यांच्याकडे १५ उमेदवार आणि १ अपक्ष असे १६ आमदार आहेत. म्हणजेच ठाकरे गटाला ७ जागांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटानं पाठिंबा दिला आहे. शरद पवार गटाकडे १२ आमदार आहेत. म्हणजेच त्यांना ११ मतांची गरज आहे.

logo
marathi.freepressjournal.in