

पुणे : मध्य पूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुबई येथे अडकलेले पुण्यातील १८४ रहिवाशांपैकी १११ रहिवासी पुण्यात सुखरूप पोहोचले आहेत. दरम्यान, १९ नागरिकांच्या विमान उड्डाणाची वेळ बदलण्यात आली असून ५४ नागरिकांना परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बुधवारी येथे दिली.
भारत सरकार व राज्य सरकारच्या निर्देशानुसार परदेशात वास्तव्याला असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. पॅलेस्टाईन (रामल्लाह), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवेत, बहारीन, मस्कत, जॉर्डन तसेच संयुक्त अरब अमिरात (अबुधाबी) येथे वास्तव्याला असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, अनावश्यक हालचाली टाळाव्यात व प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सरकारने केले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका !
आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या २४७ हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा. नागरिकांच्या सुरक्षेबाबत सतर्कता बाळगली जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही आवश्यकता असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या ०२०-२६१२३३७१, २६१३३५२२, २६१३३५२२ यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
उल्हासनगरात चार परिवारांसाठी मदतीचा हात
उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील चार कुटुंबे दुबई येथे अडकून पडली आहेत. पर्यटनासाठी गेलेल्या या कुटुंबांच्या अचानक बिघडलेल्या प्रवास व्यवस्थेमुळे त्यांच्यावर परदेशात अडचणींचे सावट आले. मात्र, संकटाच्या क्षणीही उल्हासनगरकरांनी पुन्हा एकदा एकजुटीची ताकद दाखवत मदतीचा हात पुढे केला आहे. कॅम्प क्रमांक ४ परिसरातील एक कुटुंब, अमन टॉकीज परिसरातील एक कुटुंब, कुर्ला कॅम्प येथील एक कुटुंब तसेच आणखी एक कुटुंब अशा चार परिवारांचा दुबईतील मुक्काम अडकून पडला आहे. परदेशात निवास, भोजन व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने संबंधित कुटुंबांनी उल्हासनगरमधील भाजप नेते धनंजय बोडारे, समाजसेवक परमानंद गेरेजा, दिनेश मिरचंदानी आणि भारत बठीजा यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधल्यानंतर दुबई येथे अडकलेल्या कुटुंबांसाठी हॉटेलमध्ये विनामूल्य निवासाची व्यवस्था करण्यात आल्याने या कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.
नालासोपाऱ्यातील युवक अडकला रशियात!
वसई : पर्यटनासाठी गेलेला नालासोपाऱ्यातील एक तरुण रशियात अडकून पडला आहे. रशियात व्हिसा आणि मास्टरकार्डवर आलेले निर्बंध आणि विमान कंपनी आणि ट्रॅव्हल एजन्सीकडून मिळालेल्या असहकार्यामुळे त्याने समाजमाध्यमांवर आपली व्यथा मांडली आहे. रशियात सध्या आंतरराष्ट्रीय बँकिंग व्यवहारांवर निर्बंध असल्याने त्याचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड चालत नाहीत. हातात असलेली सर्व रोख रक्कम संपल्याने पिण्याच्या पाण्यासाठीही त्याला संघर्ष करावा लागत आहे. त्याने रशियातील भारतीय दूतावास आणि नागरी उड्डाण मंत्रालयाकडे मदतीची मागणी केली आहे. "माझे कुटुंब घरी वाट पाहत आहे, पण मी सुरक्षित घरी पोहोचू शकेन की नाही, याची मला भीती वाटत आहे," अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ठाणेकरांसाठी संपर्क
ठाणे नियंत्रण कक्ष : ०२२-२५३०१७४०/९३७२३३८८२७
ठाणे पोलीस नियंत्रण कक्ष : ०२२२५४४५३५३/०२२२५४४२८२८/०२२-२५४४३६३६
मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई : ९३२१५८७१४३/०२२-२२०२७९९०
प्रशासन तत्पर
ठाणे : इराण-इस्रायल या देशांमधील युद्धजन्य परिस्थिती पाहता प्रशासनामार्फत नागरिकांसाठी आवश्यक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे. दरम्यान, ठाण्यातील रहिवाशांचे नातेवाईक अथवा परिचित इराण किंवा इस्रायल येथे वास्तव्यास असल्यास त्यांच्या सुरक्षिततेबाबत किंवा इतर कोणत्याही बाबतीत माहिती आवश्यक असल्यास संबंधितांनी जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.