मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड, किल्ल्यांची निर्मिती केली ती दूरदृष्टी ठेवून. स्वराज्य रक्षणासाठी जागरूकता महत्त्वाची हे महाराजांनी त्यावेळी ओळखले. महाराजांनी बांधलेले गड, किल्ले म्हणजे जाज्ज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा आहे. स्वराज्य निर्मितीत मोलाचे योगदान देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे १२ किल्ले नक्कीच जागतिक वारसा यादीत समाविष्ट होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील लष्करी भूप्रदेश या वैशिष्ट्यपूर्ण वारशाचा समाविष्ट व्हावा यासाठी भारताकडून प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
या नामांकन प्रक्रियेचे ठोस समर्थन व्हावे आणि याबाबत अधिक मार्गदर्शन होण्याच्या उद्देशाने जागतिक वारसा समितीच्या ४६ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष आणि युनेस्कोमधील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांना निमंत्रित करण्यात आले होते.
महाराष्ट्राचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास आहे. त्यांचे युद्ध कौशल्य, नीती, गनिमीकावा हे आजही अनेक पिढ्यांना प्रेरणादायी आहे. त्यांचा इतिहास हा देशासाठी अभिमानास्पद आहे. गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने येथील गड, किल्ल्यांच्या डागडुजी आणि सुधारणेसाठी प्रयत्न केले. हा वारसा जपण्यासाठी अधिक निधी राज्य शासनाने दिला आहे.
भारतीय पुरातत्व विभागाच्या सहाय्याने या गड, किल्ल्यांना अधिक चांगले रुप देऊन सर्वांना प्रेरणा देणारा इतिहास प्रत्यक्ष जाऊन पाहण्याची संधी मिळेल. सर्वांच्या सहकार्य आणि समन्वयातून निश्चितपणे जागतिक वारसा स्थळांमध्ये याचा समावेश होईल, असे मुनगंटीवार म्हणाले.
दरम्यान, यावेळी जागतिक वारसा केंद्र समितीच्या ४६ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष आणि भारताचे युनेस्कोमधील राजदूत तथा स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांनी मार्गदर्शन केले. राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्यावतीने ‘भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश’ जागतिक वारसा नामांकनाबाबत ‘सह्याद्री’ अतिथीगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा, जागतिक वारसा समितीच्या ४६ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष आणि युनेस्कोमधील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, भारतीय पुरातत्व विभागाचे अतिरिक्त महानिदेशक डॉ. जान्विज शर्मा, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे क्षेत्रीय संचालक डॉ. टी. श्रीलक्ष्मी, अधीक्षक शुभा मुजूमदार, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, राज्याचे पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक सुजीत कुमार उगले आदी उपस्थित होते.
या किल्ल्यांचा प्रस्ताव
महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी, राजगड, प्रतापगड हे ११ आणि तामिळनाडू येथील जिंजी आदी १२ किल्ल्यांचा प्रस्तावात समावेश आहे.
गड, किल्ल्यांवर मद्यपानास बंदी घालणार
महाराजांच्या गड, किल्ल्यांचे पावित्र्य जपले जावे, यासाठी तेथे मद्यपान करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद असणारा कायदा राज्य शासन लवकरच आणणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.