
मुंबई : राज्यात ३० डिसेंबर ते २२ जानेवारी २०२५ या कालावधीत १२ वाघांचा मृत्यू झाला आहे. अपघाती व आपसातील संघर्षातून हे मृत्यू झाले आहेत. मात्र २००६ च्या तुलनेत सद्यस्थितीत वाघांची संख्या ४४४ वर पोहोचली आहे. त्यामुळे १८ वर्षांत वाघांच्या संख्येत सरासरी ३५०ने वाढझाली आहे.
राज्यात वाघांचे होणारे मृत्यू शासनाने गांभीर्याने घेतले असून वन अधिकाऱ्यांना अपघाती मृत्यू रोखण्याचे निर्देश दिल्याची माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील वनक्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के पर्यंत वाढविण्याचा प्रयत्न असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
३० डिसेंबर २०२४ ते २२ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये राज्यात विविध घटनांमध्ये बारा वाघांचा मृत्यू झाला आहे. पाच वाघांचा मृत्यू आपापसातील संघर्षातून जखमी झाल्याने, आजारपणामुळे इत्यादी नैसर्गिक कारणांनी झालेला आहे. चार वाघांचा मृत्यू अन्य जनावरांसाठी लावण्यात आलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागल्याने झाला आहे. किंवा वाहनांच्या धडकेने झाला आहे. तीन प्रकरणांमध्ये वाघांचा मृत्यू हा शिकारीने झाल्याचे समोर आले आहे. या तीनही प्रकरणांमध्ये एकूण नऊ आरोपींना वनखात्याने अटक केली आहे.
राज्यात वाघांच्या संख्येत झपाट्याने वाढ
राज्यामध्ये २००६ मध्ये १०३ वाघांची संख्या होती. २०१० मध्ये ही संख्या वाढून १६९ झाली. २०१४ मध्ये आणखी वाढ होऊन वाघांची संख्या १९० वर पोहोचली. २०१८ मध्ये वाघांची संख्या ३१२ होती. तर २०२२ मध्ये झालेल्या वाघांच्या गणनेमध्ये वाघांची संख्या ४४४ नोंदली गेली. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दर चार वर्षांनी वाघांची गणना करण्यात येते. त्यामुळे पुढील जनगणना २०२६ मध्ये होणार आहे, असेही नाईक यांनी सांगितले.
प्रत्येक जिल्ह्यात अद्ययावत नर्सरी
खासगी वनीकरणाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचित केल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अद्ययावत नर्सरी उभारण्यात येणार आहे.
वन क्षेत्र ३० टक्के करणार
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्याचे वनक्षेत्र किमान ३० टक्के असायला हवे. या अनुषंगाने महाराष्ट्राचे वनक्षेत्र २१ टक्यावरून ३९ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. जंगलांच्या गाभा क्षेत्रामध्ये रान फळांची रायवळ आंबे, बोर, जांभूळ इत्यादी झाडे लावल्यास शाकाहारी प्राण्यांना त्या ठिकाणीच अन्नाची सोय होईल आणि मांसाहारी प्राण्यांच्या अन्नाची सोय देखील होईल. त्यामुळे भक्षाच्या शोधार्थ वाघ मानवी वस्तीपर्यंत येणार नाहीत, असे वनमंत्री गणेश नाईक म्हणाले.
वाघांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना
- जिल्हास्तरीय व्याघ्र समितीच्या बैठकीत वाघ, बिबट इतर वन्यप्राण्यांच्या संरक्षणाच्या उपाययोजनांची आखणी करण्यात येत आहे.
- विद्युत प्रवाहाचा धक्का लागून वाघांचे होणारे मृत्यू थांबवण्यासाठी वनविभाग व महावितरण कंपनी मिळून प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहे.
- व्याघ्र संरक्षण दलातील पथकामार्फत अतिसंवेदनशील क्षेत्रात नियमित गस्त करण्यात येते. डॉग स्कॉड अंतर्गत सुद्धा गस्ती करून शिकारी हालचालीवर नियंत्रण ठेवण्यात येते.
- एम स्ट्रीप प्रणाली असलेल्या मोबाइलचा पुरवठा क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना करण्यात आला आहे. त्याद्वारे संशयास्पद गतीविधींवर लक्ष ठेवण्यात येते.
- वाघाचे भ्रमणमार्ग, पाणवठे व महत्वाचे ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून संशयास्पद हालचालीवर पाळत ठेवण्यात येते. पाणवठ्याची नियमीत तपासणी केली जाते.