मुंबई-पुणे मार्गावर खासगी बस दरीत कोसळून अपघातात १३ जणांचा मृत्यू ; मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश

या बसमध्ये एकूण ४० ते ४५ जण प्रवास करत होते, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
मुंबई-पुणे मार्गावर खासगी बस दरीत कोसळून अपघातात १३ जणांचा मृत्यू ; मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर आज (शनिवारी) पहाटे चारच्या सुमारास भीषण अपघात झाला. खासगी बस दरीत कोसळून झालेल्या या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याशिवाय या बसमध्ये एकूण ४० ते ४५ जण प्रवास करत होते, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर २० ते २५ प्रवासी जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. गोरेगाव, मुंबई येथील बाजीप्रभू वादक पथक पुण्याला एका कार्यक्रमासाठी गेले होते. पुण्याहून परतत असताना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर त्यांच्या बसला अपघात झाला. शिंगरोबा मंदिराजवळील घाटात बस बाजूच्या दरीत कोसळली. पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रायगडच्या खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तात्काळ मदत देण्याच्या सूचना करतानाच जखमींना शासकीय खर्चाने तातडीने वैद्यकीय उपचार देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. अपघातानंतर मुख्यमंत्र्यांनी गिर्यारोहक आणि तत्काळ मदतकार्यात सहभागी झालेल्या आयआरबी टीमच्या तरुणांशी चर्चा केली. या संकटात मदतीसाठी तातडीने धाव घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या टीममधील सदस्यांचे कौतुक केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in