

जालना : जालना शहरातील ‘सीटीएमके’ गुजराती विद्यालयातील एका १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
गेल्या काही दिवसांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या मंगळवारी सांगलीच्या शौर्य प्रदीप पाटील नामक विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. तो दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेचा विद्यार्थी होता. त्याने शाळेतील शिक्षकांच्या जाचाला कंटाळून दिल्लीच्या राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली होती. त्यानंतर अर्णव खैरे नामक विद्यार्थ्याने कल्याण येथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याने हिंदी, मराठी भाषिक वादात लोकलमध्ये झालेल्या मारहाणीमुळे टोकाचे पाऊल उचलले होते. या दोन्ही घटनांनंतर आता जालन्याच्या ‘सीटीएमके’ गुजराती विद्यालयातील एका १३ वर्षीय विद्यार्थिनीने इमारतीवरून उडी मारत मृत्युला कवटाळले आहे.
आरोही दीपक बिर्लान असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती इयत्ता आठवीत शिकत होती. आरोही मस्तगड, जालना येथे राहत होती. आज सकाळी शाळेची प्रार्थना झाली. त्यानंतर विद्यार्थी आपापल्या वर्गात जात होते. आरोही देखील आपल्या वर्गात गेली होती. त्यानंतर तिने अचानक उडी मारली. हा प्रकार घडला तेव्हा सर्व शिक्षक प्रार्थनेसाठी खाली मैदानात होते. आरोहीला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. सकाळी ७.३० ते ८ च्या सुमारास हा प्रकार घडला, अशी माहिती शाळेच्या शिक्षकांनी दिली.