मुंबई पोलिसांची १३ हजार पदे रिक्त उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण

मुंबई पोलिसांत विविध १२ हजार ८९९ पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. रिक्त पदांमुळे २४ तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांवर कामाचा ताण वाढत आहे.
मुंबई पोलिसांची १३ हजार पदे रिक्त उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण

मुंबई : डोळ्यात तेल घालून दिवसरात्र मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचा जागता पहारा असतो. पोलिसांचा वॉच असल्याने काही प्रमाणात गुन्हेगारीला आळा बसला आहे. मात्र मुंबई पोलिसांत विविध १२ हजार ८९९ पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. रिक्त पदांमुळे २४ तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांवर कामाचा ताण वाढत आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाकडे अर्ज करत सद्यस्थितीत मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांची माहिती मागितली होती. मुंबई पोलीस आयुक्तलयांचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद कांबळे यांनी गलगली यांस ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंतची माहिती दिली. यात एकूण मंजूर पदांची संख्या ५१३०८ आहेत. यात ३८४०९ कार्यरत पदे असून १२८९९ पदे रिक्त आहेत.

सर्वाधिक पोलीस शिपाईची पदे रिक्त

पोलीस शिपाईची २८९३८ पदे मंजूर आहेत. यापैकी १७८२३ कार्यरत पदे असून ११११५ पदे रिक्त आहेत. यानंतर पोलीस उपनिरीक्षकांची ३५४३ पदे मंजूर असताना फक्त २३१८ कार्यरत पदे असून १२२५ पदे रिक्त आहेत. पोलीस निरीक्षक ही १०९० मंजूर पदे असून यापैकी ३१३ पदे रिक्त असून, सध्या ९७७ कार्यरत पदे आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्तांची १४१ पैकी २९ पदे रिक्त आहेत. पोलीस उपायुक्तांची ४३ पदे मंजूर असून, ३९ पदे कार्यरत आहेत. यात ४ पदे रिक्त आहेत, तर अप्पर पोलीस आयुक्तांचे १२ पैकी फक्त १ पद रिक्त आहे.

...तर ताण कमी होईल!

मंजूर पदे ही पूर्वीपासून असून यात काही बदल झाला नाही. पण प्रत्येक वर्षी सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. काळानुसार बदल करत रिक्त पदे भरताना मंजूर पदांची संख्या वाढविली, तर मुंबई पोलिसांवर येत असलेला ताण कमी होईल, असे गलगली यांनी नमूद केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in