प्रतिनिधी/मुंबई : महायुती सरकारची भूक दिवसेंदिवस वाढत असून राज्यात आठ हजार कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा गाजत असताना सरकार आता १५५ कोटींचा मोबाईल घोटाळा करू पाहत आहे. आपल्या मर्जीतील कंपनीकडून १५५ कोटी रुपयांची मोबाईल खरेदी करण्याचा सरकारचा इरादा आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी येथे केला. त्याचबरोबर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मते मिळवण्यासाठी अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना सरकार साड्या वाटणार आहे. हा घोटाळा देखील १०० कोटींपेक्षा अधिक आहे. या दोन्ही घोटाळ्यांतील वाटा मंत्री आणि सरकारला मिळणार असल्याचा दावाही त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
या सरकारमध्ये दोन अलीबाबा आणि ८० चोर आहेत. त्यांच्यात पैसे खाण्याची स्पर्धा सुरू आहे. लोकसभा आचारसंहितेच्या अगोदर सरकारी तिजोरी लुटून खाण्याचा सरकारचा इरादा आता लपून राहिला नाही. पैसे खाण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्याची शक्कल सरकारने लढवली आहे. मोबाईल द्यायचा असेल तर सरकारने अंगणवाडी सेविकांच्या खात्यात थेट पैसे जमा करावेत. अंगणवाडी सेविकांना हवा तो मोबाईल घेण्याची मुभा द्यावी. मग भ्रष्टाचार होणार नाही. अंगणवाडी सेविका प्रामाणिक आहेत. त्यांच्यावर सरकारचा विश्वास नाही का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.
सरकार दिल्लीतील मर्जीतील कंपनीचा खिसा भरणार आहे. महिला आणि बालविकास विभाग १५५ कोटी रुपयांचा चुना लावणार आहे. हा घोटाळा सरकारने वेळीच थांबवावा, दिल्लीची ही कंपनी कुणाच्या जवळची आहे याची चौकशी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. रुग्णवाहिका, मोबाईल घोटाळ्यानंतर आता सरकारने साडी घोटाळा केला आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला महायुती सरकार एक साडी देणार आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मते मिळविण्याचा सरकारचा हा केविलवाणा प्रयत्न करत आहे, अशी टीका त्यांनी केली.
मंत्रालयात गुंडांकडून रिल
महायुती सरकार राज्यातील गुंडांना अभय देत असून सरकारच्या मेहेरबानीने हे गुंड राजरोस फिरत आहेत. जामिनावर सुटलेला गुंड नीलेश घायवाळ मुख्यमंत्र्यांना भेटतो. मंत्रालयात बिनधास्त फिरतो. मंत्रालयात रिल्स बनवतो. सामान्य माणूस मात्र रांगेत उभा असतो. यालाच अच्छे दिन म्हणायचे का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.