
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये विविध भागांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील तब्बल १,५९३ पर्यटकांच्या सुरक्षित आणि लवकर परतीसाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी गुरूवारी दिली. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्वाधिक पर्यटक पुण्यातील
या वृत्तानुसार, काश्मीरमध्ये सर्वाधिक पर्यटक पुणे जिल्ह्यातून आहेत. पुणे जिल्ह्यातील ६५९ पर्यटक आहेत. त्यानंतर नाशिक, नागपूर येथून प्रत्येकी १९८ आणि ठाण्यातून १५६ पर्यटक आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पर्यटकांच्या परतीसाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आर. विमला यांनी सांगितले की, "सुमारे ५०० पर्यटकांनी राज्य सरकारच्या हेल्पलाईनवर संपर्क साधून मदतीची विनंती केली आहे. मागणीनुसार विमानांची व्यवस्था केली जात आहे आणि पर्यटकांच्या नावांची यादी बनवली जात आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.
काही पर्यटक खासगी ट्रॅव्हल्समार्फत किंवा आधीच्या तिकीटांवर परतणार
"काही पर्यटकांनी खासगी टूर ऑपरेटरमार्फत किंवा आधीच बुक केलेल्या तिकिटांवर परतण्याचा निर्णय घेतला असून, अशा पर्यटकांनी त्यांच्याबाबतची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे." काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या परतीसाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या असून, सर्व यंत्रणा समन्वयाने कार्यरत असल्याचे दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या रहिवासी आयुक्त आर. विमला यांनी सांगितले. सर्व पर्यटकांना सुरक्षितरित्या परत आणण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असेही ते म्हणाले.
थांबलेल्या पर्यटकांना हॉटेलमधून बाहेर न पडण्याचा सल्ला
टूर ऑपरेटरही आधीच आरक्षित तिकिटांवर परत येणाऱ्या पर्यटकांना मदत करत आहेत. "आम्ही त्यांच्यासाठी व्यवस्था करत आहोत. भीतीचे वातावरण आता काहीसे निवळले असले, तरी जे पर्यटक तिथेच थांबले आहेत, त्यांना हॉटेलमधून बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे," असे राजन पारख, राज्य पर्यटन संघटनेचे सचिव यांनी सांगितले.
पुण्यातील २७४ जण २९ एप्रिलपर्यंत परतणार
पुणे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ते २९ एप्रिलदरम्यान २७४ पर्यटकांना विमान, रेल्वे किंवा खासगी वाहनांच्या माध्यमातून परत आणले जाणार आहे.
रेल्वेलाही फटका, अनेक तिकिटे रद्द
पुण्याचे खासदार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी सांगितले की, "इंडिगोचे एक विशेष विमान शुक्रवारी दुपारी श्रीनगरहून २३२ प्रवाशांना घेऊन मुंबईत दाखल होणार आहे. काश्मीरला ट्रेनने गेलेले अनेक पर्यटक देखील अडकले आहेत. अजूनही अनेक नागरिक संपर्क करत आहेत. सर्वांना परत आणण्यासाठी राज्य सरकारच्या समन्वयाने व्यवस्था करण्यात येत आहे." दुसरीकडे, पुणे रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्याचा रेल्वेलाही फटका बसलाय. प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. २२ एप्रिल रोजी पुणे-जम्मू झेलम एक्सप्रेसचे ३५८ तिकिटे रद्द करण्यात आली, तर २३ एप्रिल रोजी ७२५ तिकिटे रद्द करण्यात आली.