१६ आमदार लोकसभेच्या मैदानात; महायुतीच्या ७, मविआच्या ७ आमदारांचा समावेश

राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, एकूण ४८ जागांसाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.
१६ आमदार लोकसभेच्या मैदानात; महायुतीच्या ७, मविआच्या ७ आमदारांचा समावेश
Published on

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, एकूण ४८ जागांसाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. एकीकडे महायुतीने कंबर कसली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीही तोडीस तोड लढत देत आहे. त्यामुळे सर्वच मतदारसंघांत चुरस वाढली आहे. या निवडणुकीत जवळपास १६ विद्यमान आमदार खासदारकीसाठी मैदानात उतरले आहेत. यामध्ये ७ महायुतीचे तर ७ महाविकास आघाडीच्या आमदारांचा समावेश आहे. यासोबतच बहुजन विकास आघाडी आणि रासपच्या प्रत्येकी एका आमदारांचा समावेश आहे. बऱ्याच ठिकाणी आमदारांना मैदानात उतरविल्यानेच अधिक चुरस वाढल्याचे चित्र आहे.

राज्यात आतापर्यंत २ टप्प्यांतील मतदान पार पडले आहे. एकूण ५ टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, आता मंगळवार, दि. ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार असून, राज्यात या टप्प्यात ११ मतदारसंघांत मतदान होणार आहे. प्रमुख राजकीय नेते प्रचारासाठी मैदानात उतरले असतानाच राष्ट्रीय नेतेही राज्यात सभा घेत आहेत. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जोरात सुरू आहेत. त्यातच या निवडणुकीत विद्यमान आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

राज्यात लोकसभेसाठी मैदानात असलेल्या आमदारांमध्ये कॉंग्रेसचे पुण्यातील कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून, सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून, मुंबईतील धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांना उत्तर-मध्य मुंबईतून, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना चंद्रपूरमधून आणि दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांना अमरावतीतून मैदानात उतरविण्यात आले. यासोबतच महायुतीतील भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना सोलापूर, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून, मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांना इशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. तसेच शिंदे गटाचे मंत्री तथा पैठणचे आमदार संदीपान भउमरे यांना छत्रपती संभाजीनगरमधून, जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर यांना उत्तर-पश्चिम मुंबईतून, उमरेडचे राजू पारवे यांना रामटेकमधून, भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी देण्यात आली. यासोबतच विधान परिषदेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांना साताऱ्यातून आणि पारनेरचे निलेश लंके यांना नगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

रासपचे जानकर रिंगणात

रासपचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांना परभणीतून महायुतीतून उमेदवारी देण्यात आली. यासोबतच हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार राजेश पाटील पालघरमधून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in