ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत १७ रुग्णांच्या मृत्यू ; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्र्यांना सल्ला

रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे आठवड्याभरात २२ जणांनी आपले प्राण गमावल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत १७ रुग्णांच्या मृत्यू ; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्र्यांना सल्ला
Published on

ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल रात्री साडेदहा वाजेपासून आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत हे रुग्ण दगावले आहेत. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून रुग्णालय प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. अपुर्ण डॉक्टर, वैद्यकीय साधनसामुग्री यामुळे हे मृत्यू झाल्याचा आरोप मृत रुग्णांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. १० ऑगस्ट रोजी देखील या रुग्णालयात ५ जणांना मृत्यू झाला होता. रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे आठवड्याभरात २२ जणांनी आपले प्राण गमावल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला होता. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा आणि खासदार सुप्रीया सुळे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे मनपाचे अधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांना सल्ला दिला आहे. सुळे यांनी ट्विट करत हा सल्ला दिला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "ही घटना धक्कादायक आहे. डॉक्टरांची अपुरी संख्या, अपुरी सामुग्री आदी कारणांमुळे या घटना घडत असल्याचं स्थानिक सांगत आहेत. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. याकडे मुख्यमंत्री, ठाणे महापालिका आणि आरोग्यमंत्री महोदयांनी वैयक्तिक लक्ष देऊन सकारात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे" असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

रुग्णालय प्रशासनाने देखील एका रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. तर ऐन शेवटच्या घटकेला काही रुग्ण हे खासगी रुग्णालयातून इकडे आल्यामुळे तर काही रुग्ण हे वयस्कर असल्यामुळे हे मृत्यू झाल्याचं रुग्णालय प्रशासनानं म्हटलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in