मुंबई : एकीकडे राज्यभरात गणपती विसर्जनाची धामधूम सुरू असतानाच राज्यात काही ठिकाणी या सोहळ्याला गालबोट लागले. गणपती विसर्जनावेळी काही युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर धुळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरखाली येऊन तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या विविध घटनांमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच विरारमध्ये गणपती विसर्जन करताना अमित सतीश मोहिते (२४) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ अशा जयघोषात फुलांची उधळण करत लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात राज्यभर निरोप देण्यात आला. पण याच उत्सवाला राज्यात अनेक ठिकाणी गालबोट लागले. राज्यभरात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात विसर्जनादरम्यान अनेक दुर्घटना घडल्या असून, धुळ्यात ट्रॅक्टरखाली चिरडून ३ बालकांचा मृत्यू झाला. तर नाशिकमध्ये तीन जण वाहून गेले. अमरावतीमध्ये तिघे जण बुडाले. जिंतूरमध्ये डीजेच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू झाला.
नाशिकमध्ये पाथर्डी परिसरामधील नांदूर रस्ता वालदेवी नदीवर गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ओंकार चंद्रकांत गाडे (२३) आणि स्वयंम भैया मोरे (२४) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
धुळ्यात ट्रॅक्टरखाली सापडून ३ बालकांचा मृत्यू
धुळ्यातील चितोड गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन तीन बालकांचा मृत्यू झाला. परी शांताराम बागुल (१३), शेरा बापू सोनवणे (६) आणि लड्डू पावरा (३) असे मृत झालेल्या बालकांची नावे आहेत.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जनादरम्यान इसापूरचे रहिवाशी असलेले तीन जण वाहून गेले. पूर्णा नगर नदीपात्रात तीन जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये मयूर गजानन ठाकरे (२८), अमोल विनायक ठाकरे (४०) यांचा समावेश आहे. दर्यापूर तालुक्यातील दारापूर येथील गणपती विसर्जनादरम्यान राजेश संजय पवार हा २७ वर्षीय युवक पाण्यामध्ये बुडाला आहे.
अहमदनगरमध्ये विळद गावातील साकळाई तलावात अजिंक्य नवले (१६) आणि केतन शिंदे (१८) या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. स्थानिक नागरिक आणि महापालिका आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जिंतूर तालुक्यातील मौजे चांदज येथे सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जनादरम्यान कर्परा नदीमध्ये भागवत कल्याण अंभोरे (१३) हा वाहून गेला. डीजेच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू झाला असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर आणि म्हैसांग येथील पूर्णा नदीवर गणेश विसर्जनावेळी दोघांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. यात म्हैसांग येथील गणेश गायकवाड (१८) या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला. तर बाळापूर शहरातील सुरज माणिक तायडे (२५) या युवकाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरच्या घाणेगावमध्ये गणेश विसर्जनावेळी तलावात बुडून एकाचा मृत्यू झाला आहे. अभय सुधाकर गावंडे (२१) असे या तरुणाचे नाव आहे.