कृषी अभ्यासक्रमासाठी १७ हजार ९२६ जागा उपलब्ध; प्रवेश प्रक्रियेला सुरुवात, पहिली गुणवत्ता यादी २७ जुलैला

राज्यातील कृषी महाविद्यालयांमध्ये कृषी अभ्यासक्रमांच्या पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी १७ हजार ९२६ जागा उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला गुरुवारी सायंकाळपासून सुरुवात झाली.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : राज्यातील कृषी महाविद्यालयांमध्ये कृषी अभ्यासक्रमांच्या पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी १७ हजार ९२६ जागा उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला गुरुवारी सायंकाळपासून सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना १५ जुलैपर्यत अर्ज करता येणार आहे. तर प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी २७ जुलैला जाहीर करण्यात येणार आहे.

एमएचटी सीईटीच्या गुणांच्या आधारे, कृषी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सीईटी कक्षामार्फत राबवण्यात येते. कृषी शिक्षणामध्ये बी.एस्सी कृषी, बी.एस्सी उद्यानविद्या, बी.एस्सी वनविद्या, बी.एफएस्सी मत्स्यशास्त्र, बी.टेक अन्न तंत्रज्ञान, बी.टेक जैवतंत्रज्ञान, बी.टेक कृषी अभियांत्रिकी, बी.एस्सी सामुदायिक विज्ञान, बीएस्सी कृषी व्यवसाय व्यवस्थापन अशा नऊ अभ्यासक्रमांचे प्रवेश एमएचटी सीईटीच्या आधारावर देण्यात येतात. एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल १५ जून रोजी जाहीर झाला होता. अखेर प्रवेश प्रक्रियेची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सीईटी सेलने ४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १५ जुलैपर्यत अर्ज करता येईल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करावी लागणार आहेत. अंतिम गुणवत्ता यादी २४ जुलैला रोजी जाहीर होणार आहे. तर पहिल्या यादी २७ जुलैला सायंकाळी ५.३० वाजता, दुसरी यादी २ ऑगस्ट रोजी केंद्रीभूत केंद्रनिहाय प्रवेश फेरी १६ ते २१ ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्व महाविद्यालयांमध्ये १६ ऑगस्टपासून वर्ग सुरू होणार आहेत. तर २६ ऑगस्ट रोजी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य सीईटी सेलने ठेवले आहे.

logo
marathi.freepressjournal.in