संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांसाठी १७० कोटींची तरतूद;विधानसभा प्रश्नोत्तरांत पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती

भाजपचे आमदार मोहन मते यांनी सोमवारी विदर्भातील संत्रा निर्यात करण्यासाठी निर्यात सुविधा केंद्र स्थापन करण्याबाबत प्रश्न विचारला होता.
संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांसाठी १७० कोटींची तरतूद;विधानसभा प्रश्नोत्तरांत पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती
PM

नागपूर : वाढीव निर्यात शुल्काची झळ बसलेल्या राज्यातील संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान म्हणून १७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. तसेच विदर्भात संत्रा प्रक्रिया उद्योग उभारला जावा म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

भाजपचे आमदार मोहन मते यांनी सोमवारी विदर्भातील संत्रा निर्यात करण्यासाठी निर्यात सुविधा केंद्र स्थापन करण्याबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना सत्तार यांनी वरील माहिती दिली. तसेच पुढील काळात ज्या शेतकरी कंपन्या संत्रा निर्यात करतील अशा शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत मंत्रिमंडळात प्रस्ताव आणला जाईल, असे आश्वासनही सत्तार यांनी दिले.

बांगलादेशने आयात शुल्क वाढवल्यामुळे  संत्रा निर्यातदारांना आर्थिक फटका सहन करावा लागला. अनेक शेतकऱ्यांना त्यांचे संत्रा पीक हे परदेशी न पाठवता स्थानिक बाजारपेठेत विकावे लागले. त्याचा परिणाम बाजारभाव गडगडल्याने आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यासाठी राज्य सरकारने १६९ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद केली असून संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांना निश्चितपणे दिलासा दिला जाईल, असे सत्तार म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख, रोहित पवार, अपक्ष देवेंद्र भोयर आदींनी उपप्रश्न विचारले.

logo
marathi.freepressjournal.in