सांगलीच्या आश्रम शाळेतील १७० विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा ; समाज कल्याण विभागाकडून चौकशीचे आदेश

कार्यक्रमातील शिल्लक जेवण उमदी गावातील समता आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आल्याने त्यांना उलटी आणि मळमळचा त्रास सुरु झाला.
सांगलीच्या आश्रम शाळेतील १७० विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा ; समाज कल्याण विभागाकडून चौकशीचे आदेश

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका आश्रम शाळेत मोठी दुर्घटना घडली आहे. जत तालुक्यातील उमदी इथल्या एका आश्रम शाळीतील जवळपास १७० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी या गावात एका ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमांमध्ये शिल्लक राहिलेलं जेवण उमदी गावातील समता आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आलं होतं. हे जेवण जेवल्यानंतर या विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळचा त्रास सुरु झाला.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार उमदी गावातील समता आश्रम शाळेतील दीडशे ते दोनशे मुलांना एका डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील शिल्लक राहिलेलं जेवण आणि बासुंदी देण्यात आली होती. मुलांनी हे जेवण जेवल्यानंतर त्यांना उटल्या आणि मळमळचा त्रास सुरु झाला होता.

विद्यार्थ्यांना त्रास झाल्यानंतर तात्काळ माडग्याळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. सध्या या मुलांवर उपचार सुरु आहेत. ७९ विद्यार्थी सध्या उपचार घेत असून उर्वरीत ९० विद्यार्थ्यांना मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आणि जत मधील रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे. या सर्व विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसंच समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्तांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करुन २४ तासांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच दोषींवर कारवाई करण्याच्या देखील सुचना दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in