१७५ टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून अमेरिकेला रवाना

१७५ टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून अमेरिकेला रवाना

जगभरातील खवय्यांना भुरळ घालणाऱ्या कोकणच्या हापूस आंब्याची परदेशवारी १२ एप्रिलपासून लासलगावमार्गे सुरू झाली. आतापर्यंत १७५ टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून तो न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस, शिकागो याठिकाणी निर्यात झाला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परदेशात शेतीमालाच्या निर्यातीवर परिणाम झाला होता. आता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या हापूस आंब्याची निर्यात लासलगावमार्गे अमेरिकेत सुरू झाली आहे.

लासलगाव येथील भाभा अणू संशोधन केंद्रातून अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, हापूस या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन १७५ टन आंबे अमेरिकेला रवाना झाले आहेत.

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या हापूस आंब्याची अमेरिकेतील नागरिकांना भुरळ पडल्याने आंब्याची मागणी वाढली आहे. दर्जेदार द्राक्षे आणि कांदा निर्यातीत पुढाकार घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आंब्याचे निर्यात केंद्र म्हणून वेगाने पुढे येत आहे.

फळमाशीच्या प्रादुर्भावाचे कारण युरोपियन महासंघाने भारतातून आयात होणाऱ्या हापूस आंब्यावर २०१३ साली बंदी घातली होती. त्यामुळे हापूसचे आता काय होणार, ही चिंता होती; पण आता ही चिंता कायमस्वरूपी मिटली आहे. गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने हापूस आंब्याची मोठ्या झपाट्याने अमेरिका व ऑस्ट्रेलियाच्या दिशेने कूच सुरू आहे.

१२ एप्रिल ते २० जुलै या कालावधीत लासलगावच्या या केंद्रात मुंबईच्या ‘अॅग्रो सर्च’ या कंपनीच्या वतीने विकिरण प्रक्रिया केली जात आहे. लासलगाव येथे ३१ ऑक्टोबर रोजी २००२मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या कृषी उत्पादन संशोधन केंद्रात हा प्रकल्प कांद्यासाठी तयार केला होता. मात्र, येथे मसाले व आंब्यावरच विकिरण करून तो निर्यात केला जात आहे.

विकिरण प्रक्रिया म्हणजे?

लासलगावच्या केंद्रात गॅमा किरणांचा ४०० ते ७०० ग्रे मात्रा विकिरण मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढवली जाते. यामुळे आंबा पिकण्याची क्रिया तर लांबतेच, शिवाय कोयीतील कीड नष्ट होते. आंब्यातील साका (सफेद गाठ) निर्मितीची प्रक्रियाही थांबते. कीड रोखण्यास हा अतिशय चांगला उपाय मानला जातो. उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रिया होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते.

२००७ पासून अमेरिकेला झालेली आंब्याची निर्यात

सन निर्यात (टन)

२००७ १५७

२००८ २७५

२००९ १२१

२०१० ९६

२०११ ८५

२०१२ २१०

२०१३ २८१

२०१४ २७५

२०१५ ३२८

२०१६ ५६०

२०१७ ६००

२०१८ ५८०

२०१९ ६८५

गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे आंबा परदेशात पाठवण्यासाठी लासलगाव येथे आला नव्हता. या वर्षी ७०० ते ८०० मेट्रिक टन आंब्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती संजय आहेर, विकिरण प्रक्रिया अधिकारी, भाभा अणू संशोधन केंद्र, लासलगाव यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in