देशात अवकाळीचे संकट ; १४ राज्यांत २ दिवस गारपीट-पावसाचा इशारा

घामाच्या धारांपासून प्रत्येक जण हैराण झाला असतानाच, अवकाळी पावसामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा घसरला
देशात अवकाळीचे संकट ; १४ राज्यांत २ दिवस गारपीट-पावसाचा इशारा

देशातील १४ राज्यांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस तसेच गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे अवकाळीचे संकट उभे राहिले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधील काही जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, पश्चिम हिमालयीन प्रदेश, वायव्येकडील मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये ३ मेपर्यंत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान खात्यानुसार, देहरादून, पुणे, दिल्ली, भोपाळ, जबलपूर, कोहिमा, भीलवाडा, जालंधर, बरेली, गया आणि हरदोई येथे २ आणि ३ मे रोजी किमान तापमान २० किंवा त्याहून कमी राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात वारा खंडितता प्रणालीमुळे अवकाळी पाऊस सुरू असून, सोमवारी विदर्भ व उत्तर महाराष्ट्रासह मुंबई, पालघर, ठाणे आणि नवी मुंबईत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार, नांदेड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा बसला, तर चोपड्यात गारपीट झाली.

राज्यातील पारा घसरला

घामाच्या धारांपासून प्रत्येक जण हैराण झाला असतानाच, अवकाळी पावसामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे. दिवसाही ढगाळ वातावरण राहिल्यामुळे प्रखर उन्हापासून नागरिकांची सुटका होत आहे. राज्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचे वातावरण असल्यामुळे उन्हाची तीव्रता कमी आहे. वाऱ्याचा वेग ताशी १५ ते २० किलोमीटर असल्याने सरासरी कमाल तापमानही ५ ते ६ अंश सेल्सिअसने घसरले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in