Pune Porsche Accident Case: अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी ब्लड रिपोर्टची अदलाबदली; ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक

ब्लड रिपोर्टमध्ये मुलगा दोषी आढळू नये, यासाठी ससूनमधील वरिष्ठ डॉक्टरांनीच त्याच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर
Pune Porsche Accident Case: अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी ब्लड रिपोर्टची अदलाबदली; ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक

Sassoon General Hospital: पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणी अजून एक मोठी अपडेट समोर आली आहे. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनीही प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन आरोपीचा वैद्यकीय अहवाल बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार (Blood Sample Tampering) केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हर्सूल या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

अल्पवयीन आरोपीने मद्यप्राशन केले नव्हते हे दाखवण्यासाठी ब्लड रिपोर्ट बदलण्यात आल्याचे समजतेय. या रिपोर्टमध्ये मुलगा दोषी आढळू नये, यासाठी ससूनमधील वरिष्ठ डॉक्टरांनीच त्याच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या संदर्भात आमदार रवींद्र धंगेकर यांनी एक्स (आधीचे ट्विटर) वर एक पोस्ट केली आहे. त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले आहेत.जे आता हळू हळू जगासमोर येतील, असे त्यांनी म्हटले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी रक्ताचे रिपोर्ट्स मिळायला उशीर झाला तेव्हाच हे संशयास्पद वाटत होते असे लिहिले आहे. याशिवाय, ससून रुग्णालयात मयत अश्विनी कोस्टा यांच्या नातेवाईकांनी मृतदेह अजून अर्धा तास शवगृहात ठेवा आमची अँब्युलन्स येत आहे,अशी विनंती केली होती. मात्र रुग्णालय प्रशासनाने त्यासही नकार दिल्याचे धंगेकरांनी म्हटले आहे.

शनिवारी पुणे पोलिसांकडून आरोपी मुलाच्या आजोबांना अटक करण्यात आली. या अटकेनंतर दोन दिवसांनी आता या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि त्यांचा मुलगा विशाल यांनी त्यांचा ड्रायव्हर गंगाधर हेरिकरुब यांच्यावर बळजबरी केली आणि अपघाताचा गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी चालकावर दबाव आणल्याचा आरोप आहे. त्यांनी ड्रायव्हरला त्यांच्या घरी कोंडून ठेवून त्याला धमकावले. परंतु, सीसीटीव्ही फुटेजमध्ये अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा मद्यधुंद अवस्थेत वेगाने कार चालवत असल्याचे दिसून आले.

अपघातानंतर आरोपी अल्पवयीन मुलाला सुरुवातीला बाल न्याय मंडळाने जामीन मंजूर केला होता. याशिवाय शिक्षा म्हणून आरोपीला रस्ते अपघातांवर निबंध लिहिण्यास सांगितले होते. परंतु अशी शिक्षा बघून जनक्षोभ झाला. यानंतर पोलिसांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेमुळे आरोपीला ५ जूनपर्यंत सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in