

कराड : पुणे-मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या अंतिम टप्प्यातील कामाला वेग आला असून नीरा रेल्वे स्थानक येथे इंटरलॉकिंगची महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने आजपासून तब्बल २१ दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना काही दिवस गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
काही गाड्या विलंबाने धावणार असल्याची माहिती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य गोपाल तिवारी यांनी दिली.
या निर्णयामुळे कोल्हापूर-पुणे डेमू (११४२६) ही गाडी १६, २२ आणि २३ जून रोजी सातारा स्थानकापर्यंतच धावणार आहे. तर १९ आणि २५ जून रोजी ही गाडी लोणंद स्थानकापर्यंतच चालविण्यात येईल. पुणे-कोल्हापूर डेमू (११४२५) ही गाडी २४ जून रोजी पुण्याऐवजी सातारा स्थानकावरून सुटेल, तर १९ आणि २५ जून रोजी ती लोणंद येथून रवाना होईल. हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस (२०६६९) ही गाडी १९ जून रोजी पुण्याऐवजी सातारा स्थानकापर्यंतच धावेल. त्याच दिवशी पुणे-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस (२०६७४) सातारा येथून कोल्हापूरकडे रवाना होणार आहे.
बिकानेर-मिरज एक्स्प्रेस (२०४७५) ही गाडी १५ जून रोजी खडकी येथेच थांबविण्यात येणार असून, परतीची मिरज-बिकानेर एक्स्प्रेस (२०४७६) १६ जून रोजी खडकी येथून सुटेल. तसेच निजामुद्दीन-वास्को एक्स्प्रेस (१२७८०) ही गाडी २४ जून रोजी मनमाड-दौंड-कुर्डुवाडी-मिरज या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
काही गाड्या विलंबाने धावणार
२० जून रोजी कोल्हापूर-पुणे डेमू सुमारे दोन तास विलंबाने दुपारी १२.५० वाजता सुटेल. २१ जून रोजी निजामुद्दीन एक्स्प्रेस सुमारे सव्वातास उशिराने धावणार आहे, तर २५ जून रोजी कोल्हापूर-गोंदिया एक्स्प्रेस दोन तास विलंबाने दुपारी ४.५० वाजता रवाना होईल. मेगाब्लॉकच्या कालावधीत दररोज तीन ते चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने बंगळूर-गांधीधाम एक्स्प्रेस, कोल्हापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) एक्स्प्रेस यांसह विविध गाड्यांना मार्गातील स्थानकांवर १५ मिनिटांपासून अडीच तासांपर्यंत थांबविण्यात येणार आहे.