महायुतीचे २२ बिनविरोध; भाजपच्या सर्वाधिक १२, तर शिंदे सेनेच्या ७ उमेदवारांना लाॅटरी; अर्ज छाननीत विराेधकांना फटका

बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे सर्वाधिक म्हणजेच १२ उमेदवार असून शिंदेंच्या शिवसेनेचे ७ उमेदवार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर, मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. त्यामुळे, एकूण २२ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. दरम्यान, आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस...
महायुतीचे २२ बिनविरोध; भाजपच्या सर्वाधिक १२, तर शिंदे सेनेच्या ७ उमेदवारांना लाॅटरी; अर्ज छाननीत विराेधकांना फटका
महायुतीचे २२ बिनविरोध; भाजपच्या सर्वाधिक १२, तर शिंदे सेनेच्या ७ उमेदवारांना लाॅटरी; अर्ज छाननीत विराेधकांना फटका
Published on

मुंबई/कल्याण : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी अर्जाचा गोंधळ शमत नाही तोच आता अर्जांच्या छाननीत अनेक राजकीय पक्षांना धक्के बसत आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या युतीचे तब्बल ९ नगरसेवक विजयी झाले आहेत. यामध्ये भाजपचे ५, तर शिवसेना शिंदे गटाचे ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच राज्यभरात ८ महापालिकांमध्ये महायुतीचे एकूण २२ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.

बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे सर्वाधिक म्हणजेच १२ उमेदवार असून शिंदेंच्या शिवसेनेचे ७ उमेदवार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर, मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. त्यामुळे, एकूण २२ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. दरम्यान, आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने आणखी काही उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीने निवडणुकीपूर्वीच विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे. १२२ सदस्य संख्या असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेल्या ६२ जागांपैकी महायुतीने ९ जागा जिंकल्या असून महायुती आता बहुमतापासून केवळ ५३ जागा दूर आहे. त्यामुळे महायुतीत उत्साहाचे वातावरण पसरले आहे. भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची रणनीती यशस्वी ठरत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, भाजपची धुळे महानगरपालिकेत २, पनवेल महानगरपालिकेत १ जागा बिनविरोध निवडून आली आहे. राज्यात एकूण १२ जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

एबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडलेला अर्ज छाननीत ठरला वैध

मुंबई महापालिकेतील प्रभाग क्रमांक १७३ मध्ये भाजपच्या एक इच्छुक उमेदवार शिल्पा केळुसकर यांना अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी थेट बनावट एबी फॉर्मचा आधार घेत निवडणूक आयोगाकडे उमेदवारी अर्ज सादर केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे हा एबी फॉर्म मूळ नसून त्याची कलर झेरॉक्स प्रत असल्याचे उघड झाले आहे. तरीही हा अर्ज छाननीदरम्यान वैध ठरवण्यात आल्याने निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवरच गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

भाजपचे हे उमेदवार नशीबवान

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मतदान होण्यापूर्वीच भाजपच्या रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेंकर, मंदा पाटील यांच्यासह आता ज्योती पवन पाटील या वॉर्ड क्र. ‘२४ ब’मधून बिनविरोध निवडून आल्या आहेत. ज्योती पवन पाटील यांच्यामुळे बिनविरोध निवडून येणाऱ्या भाजप उमेदवारांची संख्या आता ५ वर पोहोचली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे ४ उमेदवार विजयी

कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून पॅनल क्र. २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली रणजित जोशी तर प्रभाग क्र. ‘२८ अ’मधून हर्षल राजेश मोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आमदार राजेश मोरे यांचे हर्षल मोरे हे चिरंजीव आहेत. येथील सर्व अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे या निवडणुका बिनविरोध झाल्या. याचे श्रेय खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले जात आहे.

अहिल्यानगरमध्ये मनसेचे दोन उमेदवार बेपत्ता

महापालिका निवडणुकीतील गोंधळ अद्याप सुरूच आहे. अहिल्यानगरमध्ये प्रभाग क्रमांक १७ मधून मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग हे दोन उमेदवार अचानक गायब झाले आहेत. या दोन्ही उमेदवारांचे राजकीय दबावातून किंवा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अपहरण करण्यात आले असावे, असा खळबळजनक आरोप मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर प्रभाग १७ मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग यांचा गेल्या २४ तासांपासून त्यांच्या कुटुंबाशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्यांचे मोबाईल फोनही बंद येत आहेत. मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in