सावंतवाडी-दोडामार्गातील २५ गावे 'इको सेन्सिटिव्ह'; केंद्राने जारी केली अंतिम अधिसूचना

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग या दोन तालुक्यातील २५ गावे ‘इको सेन्सिटिव्ह’ म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. दोन्ही तालुक्यातील या गावांसाठी अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक असा हा निर्णय आहे.
सावंतवाडी-दोडामार्गातील २५ गावे 'इको सेन्सिटिव्ह'; केंद्राने जारी केली अंतिम अधिसूचना
सावंतवाडी-दोडामार्गातील २५ गावे 'इको सेन्सिटिव्ह'; केंद्राने जारी केली अंतिम अधिसूचनाप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग या दोन तालुक्यातील २५ गावे ‘इको सेन्सिटिव्ह’ म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. दोन्ही तालुक्यातील या गावांसाठी अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक असा हा निर्णय आहे.

केंद्रीय पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालयाने या गावाना ‘इको सेन्सिटिव्ह’ एरिया म्हणून घोषित केले असून तशी अंतिम अधिसूचनाही प्रसिद्ध केली आहे. या निर्णयामुळे ही गावे आणि त्या परिसरातील पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या खाण प्रकल्पांना तसेच लाल श्रेणीतील प्रदूषणकारी उद्योग व प्रकल्पांना आळा बसणार आहे. सावंतवाडी येथील ‘वनशक्ती’ या स्वयंसेवी संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णयानुसार केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने वरील अधिसूचना जारी केली आहे. या आधी सूचनेनुसार संबंधित २५ गावांमध्ये पर्यावरणाला घातक प्रकल्प किंवा व्यवसाय यावर निर्बंध रहाणार आहेत. यामध्ये नवीन खाणकाम प्रकल्पांना पूर्णतः बंदी, लाल श्रेणीतील उच्च प्रदूषणकारी उद्योगांना, प्रकल्पांना मनाई, वृक्षतोड किंवा वनसंपदेचे नुकसान करणारे प्रकल्प, पर्यावरण बिघडवणारे व्यवसाय प्रकल्प यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, पारंपरिक शेती, बागायती, लघुउद्योग, स्थानिक गरजांसाठी निगडित कामांना आवश्यक अटींसह परवानगी दिली जाणार आहे. दरम्यान, याच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय निरीक्षण समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीचे अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तर उपवनसंरक्षक हे सचिव असतील.

ही आहेत २५ गावे

केसरी-फणसवडे, उंडेली, दाभिल, न्हावेली, सरमळे, ओटवणे, घारपी, असनिये, फुकेरी, तांबोळी, कोनशी, भालावल, भेकुर्ली, कुंभवडे, खडपडे, तळकट, झोळंबे, कोलझर, शिरवळ, कुंभ्रल,पणतुर्ली, उगाडे, भिके कोणाळ, कळणे, पडवे-माजगाव या दोन्ही तालुक्यातील २५ गावांचा यात समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in