मध्य रेल्वेद्वारे कोकणासाठी २६ उन्हाळी विशेष गाड्या

मध्य रेल्वेने याआधीच ९१६ उन्हाळी विशेष चालवण्याची घोषणा केली आहे आणि या अतिरिक्त उन्हाळी विशेषसह यावर्षी एकूण उन्हाळी स्पेशलची संख्या ९४२ होणार
मध्य रेल्वेद्वारे कोकणासाठी २६ उन्हाळी विशेष गाड्या

सुट्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवि दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने याआधीच ९१६ उन्हाळी विशेष चालवण्याची घोषणा केली आहे आणि या अतिरिक्त उन्हाळी विशेषसह यावर्षी एकूण उन्हाळी स्पेशलची संख्या ९४२ होणार आहे.

कोकणाकडे सोडण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये ०११२९ ही गाडी ६ मे ते ३ जूनपर्यंत दर शनिवार, सोमवार आणि बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि थिवि येथे दुसऱ्या दिवशी ११.३० वाजता पोहोचेल. तर ०११३० ही गाडी ७ मे ते ४ जूनपर्यंत दर रविवार, मंगळवार आणि गुरुवारी थिवि येथून सायंकाळी ४.४० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ४.०५ वाजता पोहोचेल.

या गाडयांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड याठिकाणी थांबे देण्यात आले असून, एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय, १० शयनयान, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी अशी यागाड्यांची संरचना करण्यात आली आहे. दरम्यान, या गाड्यांचे आरक्षण विशेष शुल्कासह ४ मे रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in