...तर २८८ आमदारांना पाडू! मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा

कोणत्याही नेत्याला भिण्याची गरज नाही, एकजुटीने मतदान करायला शिका. जर राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले नाही, तर मराठ्यांची एकत्र बैठक घेऊन २८८ आमदार पाडायचे की नाही याचा निर्णय घेऊ, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी परभणीत आयोजित शांतता रॅलीत बोलताना दिला.
...तर २८८ आमदारांना पाडू! मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा

परभणी : कोणत्याही नेत्याला भिण्याची गरज नाही, एकजुटीने मतदान करायला शिका. जर राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले नाही, तर मराठ्यांची एकत्र बैठक घेऊन २८८ आमदार पाडायचे की नाही याचा निर्णय घेऊ, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी परभणीत आयोजित शांतता रॅलीत बोलताना दिला.

परभणीत मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत मराठा जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले. जरांगे शहरात येण्याआधीच येथील रस्ते ब्लॉक झाले होते. मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव या रॅलीसाठी उपस्थित होते.

आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या वेळी आपण मुंबईच्या वेशीपर्यंत गेलो होतो, त्यावेळी मुख्यमंत्री आणि इतरांनी प्रश्न त्वरित सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आपण वाशी येथूनच परतलो, तो निर्णय आपल्या समाजाला पटला नव्हता, मात्र आता पुन्हा मुंबईला जाण्याची वेळ आली तर समाज जेव्हा आदेश देईल तेव्हाच परतणार असल्याचे जरांगे म्हणाले आणि पुन्हा एकदा मुंबईत येण्याचा त्यांनी इशारा दिला.

सगेसोयरे व नातलग यांच्यातील फरक कळत नाही का?

​​​​चंद्रकांतदादा पाटील यांना सगेसोयरे अन‌् नातलग यातील फरक कळालेला नाही, त्यामुळे त्यांनी विनाकारण गैरसमज पसरवू नये. अंमलबजावणी होणार असेल तर सगेसोयऱ्यांचीच हवी अन्यथा आम्हाला गरज नाही, आरक्षण कसे मिळवायचे ते आम्ही मराठा बांधव पाहून घेऊ, असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे यांनी हिंगोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

ते पुढे म्हणाले की, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र द्या, ज्यांच्या नोंदी नाही सापडल्या, त्यांना शपथपत्रावर प्रमाणपत्र द्यावे. कारण दोघांचेही व्यवहार एकच आहेत. आम्ही सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीची मागणी केली आहे. मात्र, चंद्रकांतदादा पाटील नातलगांना प्रमाणपत्र द्यायचे म्हणतात, त्यांना सगेसोयरे अन‌् नातलगांमधील फरक कळतो का, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला. चंद्रकांतदादा विनाकारण गैरसमज पसरवित असल्याचा आरोप त्यांनी केला.

धनगर व मराठा बांधवांमध्ये भांडणे लावली जात आहेत, मात्र आमचा धनगर आरक्षणाला विरोध नाही अन‌् त्यांच्या आरक्षणाला कोणी धक्काही लावणार नाही. येवलेवाल्यांचे ऐकून फुकट भांडण घेऊ नका. तुमच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही पाठिंबा देतो. तुमच्यासाठी आम्ही कोट्यवधी मराठा बांधव पाठीशी उभे राहू, असे त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाबाबत आज सर्वपक्षीय बैठक

मराठा आरक्षणाच्या विषयावर राज्य सरकारने सोमवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत होणाऱ्या या बैठकीला राज्य सरकारमधील अनेक मंत्री, तसेच शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते, खा. छत्रपती उदयनराजे भोसले, माजी मुख्यमंत्री व राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यासह अनेक नेते व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in