मराठा आरक्षणासाठी ३ अधिसूचना काढणार; बच्चू कडू यांची माहिती; मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

विभागीय आयुक्तांची भेट घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी ही माहिती दिली. संपूर्ण महाराष्ट्रात ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत.
मराठा आरक्षणासाठी ३ अधिसूचना काढणार; बच्चू कडू यांची माहिती; मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

राजा माने/मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४ सचिव यांच्यासोबत सोमवारी तब्बल ५ तास बैठक झाली. या बैठकीत प्रत्येक शब्दावर बारकाव्याने चर्चा झाली असून, मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार ३ अधिसूचना काढणार आहे. यासोबतच सगेसोयऱ्यांच्या मुद्यावरूनही एक मसुदा तयार करण्यात येणार आहे. तो मसुदा मनोज जरांगे-पाटील यांना दाखविण्यात येईल, असेही आमदार बच्चू कडू म्हणाले.

विभागीय आयुक्तांची भेट घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी ही माहिती दिली. संपूर्ण महाराष्ट्रात ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यापैकी ३० ते ३५ हजार नोंदी मराठवाड्यातील आहेत. सगेसोयरे यांना आरक्षण कसे देता येईल, यासंदर्भात एक मसुदा तयार करण्यात येणार आहे. या संदर्भात अधिसूचना काढणार आहोत. त्यादेखील मनोज जरांगे यांना दाखवण्यात येणार आहेत, असेही बच्चू कडू म्हणाले. प्रशासन जास्तीत जास्त दाखले देणार आहे. आता विभागीय बैठक झाली, आता जिल्हास्तरावर जाऊ, असेही त्यांनी सांगितले. कोतवाल बूक आणि जन्म-मृत्यू नोंदी मराठवाड्यात सापडत नाहीत. विदर्भात या नोंदी सहज सापडतात. जे कागदपत्र आहेत, ते जीर्ण आहेत. मात्र मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे तब्बल १ कोटी ९४ लाख कागदपत्रांची तपासणी केली. हे जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाचे यश असल्याचे बच्चू कडू म्हणाले.मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील हे आरक्षणाच्या आंदोलनावर ठाम असून, २० जानेवारी रोजी ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्यानंतर आता राज्य सरकारकडून मनधरणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार योग्य तो मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे-पाटील यांना मुंबईला येण्याची वेळच येणार नाही, असे राज्याच्या एका मंत्र्याने म्हटले. त्यामुळे सरकार काय तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माझ्याविरोधात मोठे षड‌्यंत्र : जरांगे-पाटील

मराठा आरक्षणाचा लढा आता आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण मराठा आरक्षणासाठी निकराचा लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन आता मुंबईत धडकणार असून, २० जानेवारी रोजी जरांगे यांच्यासह मराठा बांधव मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगे-पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला असून, हे आंदोलन रोखण्यासाठी मोठे षड‌्यंत्र रचले जात असून, याचाच एक भाग म्हणून आमच्या लोकांवर फोडाफोडीचा डाव आखला जात असल्याचा आरोप केला. काहीही झाले तरी आता माघार नाही, असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in