पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या गोंदीयातील ३ शिक्षकांचा छत्तीसगडमध्ये धरणात बुडून मृत्यू

पर्यटकांना पाण्यात उतरण्याचा मोह आवरला जात नाही. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक दुर्देवी घटना घटत असतात. अशीच एक बातमी समोर आली आहे.
पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या गोंदीयातील ३ शिक्षकांचा छत्तीसगडमध्ये धरणात बुडून मृत्यू
Published on

अनेकजण पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेट देतात. यावेळी खबरदारी न बाळगल्यामुळे किंवा गाफील राहील्याने दुर्घटना घडतात. यात अनेकांना त्यांच्या प्राणांना मुकावं लागतं. काही वेळा पर्यटकांना पाण्यात उतरण्याचा मोह आवरला जात नाही. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक दुर्देवी घटना घटत असतात. अशीच एक बातमी समोर आली आहे.

गोदिंयामधून छत्तीसगढमध्ये फिरायला गेलेल्या तीन शिक्षकांचा पाण्याचा अंदाज न आल्यानं धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. छत्तीसगढ राज्यामधील सोमणी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या माणगावात ही घटना घडली असून बुडून मृत्यू झालेले तिघेही शिक्षक होते. गोंदियात एका कोचिंग क्लासमध्ये ते तिघे शिकवत होते. तिन्ही मृतक नागपूर, भिलाई आणि उत्तर प्रदेश येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या घटनेमुळे गोंदियामध्ये सगळ्यांना धक्का बसला आहे.

माहितीनुसार, हे तिघेही शिक्षक गोंदियातील सिद्धिविनायक कोचिंग क्लासमध्ये काम करत होते. काल रात्री उशिरा फिरायला गेले असता तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यावेळी रात्री उशिरापर्यंत या तिघांची शोधमोहीम सुरू होती. एन. मिश्रा (भिलाई), अरविंद (उत्तर प्रदेश) आणि अतुल कडू (नागपूर) अशी बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. हे तिन्ही जण फिरायला गेले असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने धरणाच्या पाण्यात बुडाल्याचं स्थानिकांकडून सांगितलं जात आहे.

दरम्यान, धरणाच्या पाण्यात तीन शिक्षक बुडाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन पुढील शोध मोहीम चालू केली. शोधकार्यादरम्यान रात्री एकाचा तर आज सकाळी इतर दोघांचे मृतदेह सापडले. पोलिसांनी तिन्ही मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवलं आहे. या तिन्ही शिक्षकांच्या मृत्यूवर गोंदियासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in