चंद्रपूर जिल्ह्यात ५ दिवसात ३ वाघांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र असे असतांनाच वाघांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे
चंद्रपूर जिल्ह्यात ५ दिवसात ३ वाघांचा मृत्यू
PM

चंद्रपूर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाघांच्या मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या पाच दिवसात विविध कारणांमुळे सावली वन परीक्षेत्रात तीन वाघांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे प्राणीप्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

राज्यात सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यात असून त्यात ताडोबा आणि सावली वन परीक्षेत्रात वाघांची संख्या जास्त आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी सकाळी सावली तालुक्यातल्या सामदा गावाजवळील एक वाघ मृतावस्थेत आढळला. गोसेखुर्द कालव्याच्या बाजूला असलेल्या शेतात हा मृत वाघ संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. वनपथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या प्रकरणी त्यांनी तपास सुरू केला आहे.

२४ डिसेंबरला देखील शिकारीच्या शोधात असलेल्या एका वाघाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. नागभीड तालुक्यातील गोविंदपूर शेत शिवारातील ही घटना घडली होती. हा वाघ दीड वर्षांचा असून नर जातीचा आहे. गुरुवारी २१ डिसेंबरला शिकारीकरिता लावलेल्या विद्युत प्रवाहाचा करंट लागून एका वाघाचा मृत्यू झाला. ही घटना ब्रम्हपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव बिटमधल्या मेंढामाल शेतशिवारात घडली होती.

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र असे असतांनाच वाघांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. या वाढत्या घटना थांबवण्याठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in