
बीड : मंत्री धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने कृषी खात्यात ३०० कोटींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी गुरुवारी केला. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
आमदार सुरेश धस यांनी गुरुवारी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत.
ते म्हणाले की, शेतकऱ्यांची तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कोणतीही मागणी नसताना खरेदीचा निर्णय घेण्यात आला. एकाच दिवशी प्रस्ताव पाठवला आणि त्याच दिवशी ‘जीआर’ निघाला. हे सर्व ‘डीबीटी’ने द्यावे, असे तत्कालीन सनदी अधिकारी प्रवीण गेडाम यांनी सुचवले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मान्यतेनुसार उपसचिव संतोष कराड यांनी नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि गोगलगाय प्रादुर्भाव रोखण्यासाठी अग्रिम देण्यात यावा, असे आदेश काढल्याची माहिती आमदार धस यांनी दिली.
ते म्हणाले की, नॅनो युरियामध्ये २१ कोटी २६ लाखांचा भ्रष्टाचार झाला आहे, ‘डीएपी’त ५६ कोटी ७६ लाख रुपये, बॅटरी ४५ कोटी ५३ लाख, कापूस साठवणूक बॅगमध्ये ५७७ ची बॅग १२५० रुपये घेण्यात आली, तर १८० कोटी ८३ लाख रुपये धनंजय मुंडे आणि त्यांच्या चमूने बाहेर काढले.
लोकायुक्त कार्यालयाला खोटी माहिती देण्यात आली. त्यामुळे, धनंजय मुंडे यांच्या काळातील या भ्रष्टाचाराची विशेष कृती दल (एसआयटी) स्थापन करून चौकशी करा, अशी मागणीही आमदार धस यांनी केली आहे.