मुंबई : राज्यातील विविध तीर्थक्षेत्र व जवळील पर्यटनस्थळांना लाखो भाविक व पर्यटक भेट देतात. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासह तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांचा विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी तब्बल ३०५ कोटी ६३ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत याबाबतच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. तसेच श्रीक्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप व दर्शन रांग या सुविधेसाठी १२९ कोटी ४९ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. दरम्यान, या सर्व ठिकाणची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत याची काळजी घ्यावी, असे निर्देशही शिंदे यांनी या बैठकीत दिले.
अमळनेर (जि. जळगांव) येथील देशातील एकमेवाद्वितीय अशा मंगळग्रह देवस्थानाच्या २५ कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. सातारा जिल्ह्यातील कोयना जलाशय-मौजे मुनावळे येथील जलक्रीडा पर्यटन सुविधेसाठी (ता.जावळी, जि.सातारा) ४७ कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीस मान्यता देण्यात आली आहे. हे सर्व प्रस्ताव पर्यटन विभागाने सादर केले.
ग्रामविकास विभागाने सादर केलेल्या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी ऋणमोचन येथील १८ कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. तसेच श्रीक्षेत्र गहिनीनाथगडच्या (जि. बीड) विकास आराखड्यातील २ कोटी ६७ लाखांच्या कामांस मान्यता देण्यात आली. याशिवाय मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाब या सशस्त्र दहशतवाद्यास जिवंत पकडणाऱ्या शहीद तुकाराम ओंबळे यांच्या सातारा जिल्ह्यातील केंडबे (ता. जावळी) येथील मूळगावी स्मारक उभारण्यासाठी १५ कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीसही बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच नगर विकास विभागाने नागपूर शहरातील आराखडे सादर केले. त्यातील लक्ष्मीनारायण शिवमंदिर- नंदनवनच्या २४ कोटी ७३ लाखांच्या विकास आराखड्यास, कुत्तेवालेबाबा मंदिर आश्रम - शांतीनगरसाठी १३ कोटी ३५ लाख रुपये आणि मुरलीधर मंदिर पारडी विकास आराखड्यासाठी १४ कोटी ३९ लाख रुपयांच्या खर्चासही यावेळी मान्यता देण्यात आली.
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते. जळगाव, नाशिक आणि सातारा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले.
प्रशस्त दर्शन मंडप, दर्शन रांग; टोकन पद्धतीने प्रवेश
पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी नेहमीच भाविक येत असतात. आषाढी आणि कार्तिक वारीसाठी लाखो वारकरी आणि भाविक पंढरपुरात येतात. त्यांच्यासाठी १६ हजार चौरस मीटरचा मंडप उभारण्यात येणार असून या मंडपात पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर सहा हजार भाविकांची सोय करण्यात येईल. या सर्वांना वेळेनिहाय टोकन पद्धतीने प्रवेश देण्यात येईल. याशिवाय त्यांना स्कायवॉक पद्धतीच्या एक किलोमीटरची दर्शन रांग असणार आहे. मंडप आणि रांगेत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, लिफ्ट, वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहेत. अन्नछत्राच्या माध्यमातून जेवणही उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक, मातांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.