राज्यात ३१७ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

आपला दवाखाना ही संकल्पना महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले
राज्यात ३१७ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजना सुरू करण्यात आली. यातून आता गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे. यात सुमारे ३० चाचण्या मोफत करण्यात येतील. आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. सर्व सामान्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे आपला प्रयत्न आहे. त्यादिशेने आपला आरोग्य विभाग काम करत आहे, याचे समाधान आहे,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत विस्तार करण्यात आला. या योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजीटल अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ‘सामान्य माणसांचा विचार करून लोकाभिमुख, लोकोपयोगी निर्णय घेण्यात सरकार प्रयत्नशील असून, त्यामध्ये आपला दवाखाना ही संकल्पना महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री फडणवीस नागपूर येथून, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत उस्मानाबाद येथून तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आदी त्या-त्या जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणांहून सहभागी झाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आपल्याला कोरोनाने आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणाचा धडा दिला आहे. छोट्या छोट्या आजारांवरील उपचारासाठी मोठ्या रुग्णांलयांचा ताण कमी करावा लागेल. या उद्देशाने आणि गरजूंना घराजवळ उपचाराची सुविधा मिळवून देण्याची गरज लक्षात घेऊन आपण ठाणे येथून या योजनेची सुरुवात केली होती. त्याची अंमलबजावणी मुंबईमध्ये सुरू केली आणि आता संपूर्ण राज्यात आपला दवाखाना सुरू होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार चालणारे हे सरकार आहे. त्यांनी देखील आरोग्य विषयाला प्राधान्य दिले होते. आज मुंबईमध्ये सुमारे २५० आपला दवाखाना कार्यरत आहेत. त्याचा लाभ लाखो रुग्णांना होत आहे. आता या योजनेमुळे ग्रामीण भागात सुलभ आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी आपण या सेवेच्या विस्ताराची घोषणा केली होती. त्यानंतर काही महिन्यांतच आरोग्य विभागाने त्यावर अंमलबजावणी करीत सामान्य नागरिकांना मोफत आरोग्यसेवेसाठी हे दवाखाने उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी आरोग्य विभाग कौतुकास पात्र आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत ६ हजार २०० रुग्णांना एकूण ५२ कोटी रुपयांहून अधिकची मदत करता आल्याचे नमूद करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत लाखो रुग्णांना उपचाराचा लाभ मिळाला आहे. आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. पंतप्रधान नरेंद मोदी हे देखील सामान्यांच्या आरोग्य सेवा आणि उपचारांबाबत संवेदनशील आहेत. त्यामुळे केंद्र स्तरावरून राबवण्यात येणाऱ्या आणि राज्याच्या योजना यामुळे डबल इंजिन सरकारचा राज्यातील जनतेला डबल फायदा होणार आहे. यापुढे जाऊन आपण जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये या सर्वच ठिकाणी आरोग्य सेवा सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 'ही अतिशय उत्तम संकल्पना आहे. या दवाखान्याच्या माध्यमातून ३० सेवा, औषध आणि वैद्यकीय सल्ला देखील मोफत मिळणार आहे. सामान्य माणसांच्या आरोग्याची काळजी घेणार हा उपक्रम आहे. आपण अर्थसंकल्पातच या संकल्पनेसाठी तरतूद केली होती. यात ५०० दवाखाने सुरु करण्यात येणार आहेत. त्यातील आज ३१७ दवाखाने सुरु होत आहेत. हेच आपल्या गतीमान सरकारचे वैशिष्ट्य आहे.'

आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांनी आपला दवाखाना ही संकल्पना मांडली. तिचा आपण अल्पावधीत विस्तार केला. आज आपण माता सुरक्षित तर घर सुरक्षित यात सुमारे ४ लाख ३९ महिलांची तपासणी पूर्ण केली असून, त्यांच्यावर ७० टक्के उपचार देखील पूर्ण केले आहेत. सदृढ बालक योजनेचीही यशस्वी अमंलबजावणी सुरू आहे. मेळघाटातील कुपोषण मुक्ती याबाबत आपण प्रभावीपणे काम करत आहोत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in