मुंबई : राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना यंदाचा स्वातंत्र्यदिन जुन्याच गणवेशावर साजरा करावा लागला. १५ ऑगस्टपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप होईल, असे आश्वासन शिक्षण मंत्री यांनी सभागृहात दिले होते. मात्र शिक्षण मंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले. स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांना जुने गणवेश घालून ध्वजारोहण करावे लागले. राज्यातील फक्त ७.५ लाख विद्यार्थ्यांना गणवेश वाटप झाले असून अजूनही ३७ लाख विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. त्यामुळे हा महायुतीचा गणवेश घोटाळा आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशात कॉटनचे प्रमाण आवश्यक असताना पॉलिस्टर कापडाचा वापर त्यात करण्यात आला आहे. तर शर्टाच्या बाह्यांसाठीही वेगळे कापड वापरण्यात आले आहे, असा आरोप करत दानवे यांनी थेट गणवेश दाखवून यातील घोटाळा उघडकीस केला. त्यामुळे संबंधित अधिकारी व पुरवठादार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी लावून धरली आहे.
...अन्यथा मराठवाड्यात आंदोलन!
मराठवाड्यातील धार्मिक श्रद्धा जोडलेल्या देवस्थानाच्या जमिनी खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचा पूर्ण विचार करावा. याविरोधात मराठवाड्यात आंदोलन सुरू होत असल्याचे दानवे म्हणाले.
...म्हणून साखर कारखान्यासाठी निर्णय!
विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहारात साखरेचे प्रमाण निश्चित केले. हा निर्णय साखर कारखानदारांच्या दबावाखाली घेतला गेलाय. ‘आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातंय’, अशी सरकारची अवस्था असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.