जळगावच्या ४ विद्यार्थ्यांचा रशियात बुडून मृत्यू, एका विद्यार्थिनीला वाचवण्यात यश

संध्याकाळी मोकळ्या वेळेत वोल्खोव्ह नदीच्या किनारी ते फेरफटका मारत होते. त्यावेळी...
जळगावच्या ४ विद्यार्थ्यांचा रशियात बुडून मृत्यू, एका विद्यार्थिनीला वाचवण्यात यश

जळगाव : रशियातील यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीत वैद्यकीय शाखेत शिकत असलेले जळगाव जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांचा वोल्खोव्ह नदीत बुडून मृत्यू झाला. एका विद्यार्थिनीला वाचवण्यात यश आले असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण १९ ते २१ वयोगटातील होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रशियन दूतावासातील कुमार गौरव (आयएफएस) यांच्याशी संपर्क करून याबाबतची सर्व माहिती जाणून घेतली. तसेच निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांनी पालकांना तेथील प्रशासनाशी संपर्क करून दिला.

हर्षल अनंतराव देसले (भडगाव), जिशान अश्फाक पिंजारी, जिया फिरोज पिंजारी (अमळनेर) आणि मलिक गुलामगौस मोहम्मद याकूब हे विद्यार्थी रशियात शिकत होते. अभ्यासाच्या मोकळ्या वेळेत संध्याकाळी वोल्खोव्ह नदीच्या किनारी ते फेरफटका मारत होते. त्यावेळी ही शोकांतिका घडल्याचे समजते. नदीत वाहून गेलेल्या एका विद्यार्थिनीला वाचवण्याच्या प्रयत्नात ही घटना घडल्याचे तेथील स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. निशा बी सोनवणे असे वाचवण्यात यश आलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

भारतीय दुतावासाने संबंधित विद्यापीठाशी संपर्क करून माहिती जाणून घेतली. मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना पूर्ण सहकार्य करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाने भारतीय दुतावासाच्या अधिकाऱ्यांना केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in