पुणे ड्रग्जप्रकरणी ४ पोलीस निलंबित; ९ जणांवर गुन्हा दाखल, ८ आरोपींना अटक

पुणे शहरातील फर्ग्युसन रोडवर असलेल्या ‘एल ३ द लिझर लाउंज’ या पबमधील स्वच्छतागृहात काही तरुण शनिवारी मध्यरात्री ड्रग्ज घेताना आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती
पुणे ड्रग्जप्रकरणी ४ पोलीस निलंबित; ९ जणांवर गुन्हा दाखल, ८ आरोपींना अटक
Published on

पुणे : पुणे शहरातील फर्ग्युसन रोडवर असलेल्या ‘एल ३ द लिझर लाउंज’ या पबमधील स्वच्छतागृहात काही तरुण शनिवारी मध्यरात्री ड्रग्ज घेताना आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, तसेच ⁠सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, पोलीस कर्मचारी गोरख डोईफोडे, अशोक अडसूळ यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान, याप्रकरणी पुणे पोलिसांनी ९ जणांवर गुन्हा दाखल केला असून ८ आरोपींना अटक केली आहे.

पुणे शहरातील फर्ग्युसन रोडवर असलेल्या ‘एल ३ द लिझर लाउंज’ या पबमधील स्वच्छतागृहात काही तरुण शनिवारी मध्यरात्री ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला, तसेच तेथे अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात होती.

याप्रकरणी संतोष विठ्ठल कामठे (रा. ४४७/४, रंजनीगंध अपार्टमेंट, शिवाजीनगर, पुणे), सचिन विठ्ठल कामठे, उत्कर्ष कालीदास देशमाने, योगेंद्र गिरासे, (रा. दवन सोसायटी, श्रीराम स्वीट मार्ट,भुगाव मुळशी), रवि माहेश्वरी (रा. उंड्री पुणे), अक्षय दत्तात्रय कामठे (रा. हडपसर, माळवाडी, पुणे), दिनेश मानकर(रा. नाना पेठ), रोहन राजू गायकवाड (रा. भोसले पार्क, हडपसर, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे, तर एका आरोपीचा शोध सुरू आहे.

पुण्यात आयोजित केलेल्या या पार्टीमध्ये ४०-५० लोक होते. त्यांना तपासाला बोलावले जाणार आहे, अशा प्रकारची पार्टी अजून कुठे झाली आहे का? याचा तपास केला जाणार आहे. या प्रकरणात दोन पोलीस अधिकारी आणि दोन बीट मार्शल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कामात हलगर्जी आणि आपल्या भागात सुरू असलेल्या गोष्टी माहिती नसणे, यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

झोन-१चे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल म्हणाले की, रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. हॉटेल आणि बार सुरू ठेवले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पबचे दोन मालक आणि दोन आयोजक आणि इतर ५ अशा एकूण ९ लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पबमध्ये पार्टीचे आयोजन कसे करण्यात आले याबाबतचा तपास सुरू आहे. तसेच जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याचा देखील तपास सुरू आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लोकांचादेखील शोध सुरू आहे. काही पुरावे मिळाले असून, त्याआधारे तपास सुरू आहे. तसेच अल्पवयीन कोणी मुले होती का, याचाही तपास सुरू आहे.

जेवण व दारूवर केले ८५ हजार रुपये खर्च

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलांचा पुणे पोलीस शोध घेत आहेत. पार्टी करणाऱ्या ग्रुपने जेवण आणि दारूवर ८० ते ८५ हजार खर्च केले आहेत. याबाबत ४० ते ५० जणांची चौकशी होणार आहे. सीसीटीव्ही पाहून ही तपासणी केली जाणार आहे. अनेकदा सूचना देऊनदेखील अंमलदार आणि अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवण्यात दिरंगाई दाखवली म्हणून दोन अधिकारी आणि दोन अंमलदारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी दिली.

तीन आरोपींच्या रक्ताचे नमुने घेतले

लिक्विड लेझर लाउंज (एलएलएल) मध्ये पार्टीसाठी आलेल्यांना अंमली पदार्थासारखा पदार्थ देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने अटक आरोपीपैकी तिघांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर इतरांची देखील चौकशी होणार असून त्यानुसार या गुन्ह्यात कलमवाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दिली.

बारचा परवाना तिसरा मजल्यासाठी असून त्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सव्वातीन लाखांचा मद्याचा साठा करून ठेवला होता आणि पहिल्या आणि चौथ्या मजल्यावर मद्यविक्री केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. सुरवातीला टोळक्याने हडपसरमध्ये पार्टी केलेल्या कलर्ट हॉटेलमध्येच फर्ग्युसन रस्त्यावर मध्यरात्री पार्टी केली जाणार असल्याचे जाहीर केले होते, ही बाब पण समोर आली आहे.

पार्टीला आलेल्यांना मागच्या दाराने प्रवेश

कारवार्इच्या दिवशी झालेल्या पार्टीचे आयोजन अक्षय कामठे याने केले होते. सोशल मीडियाचा वापर करून ग्राहकांना अंमली पदार्थांचे सेवन आणि धूम्रपान करण्यासाठी बारमध्ये बोलाविले असल्याचे प्रथमदर्शनी तपासामध्ये दिसून आले आहे. कामठे याने आयोजित केलेल्या पार्टीची एन्ट्री फी ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात स्वीकारण्यात आली आहे. बार बंद करण्याची वेळ झाल्याने पार्टीला आलेल्यांना मागच्या दाराने प्रवेश देण्यात आला होता. गायकवाड तिथे थांबलेला होता, अशी माहिती तपास अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी न्यायालयास दिली.

पार्टीला आलेल्या ग्राहकांबाबतची माहिती आरोपींकडून घ्यायची आहे. तसेच पार्टीत अमली पदार्थ कोणी व कुठून आणले, याबाबत अधिक माहिती व पुरावे हस्तगत करायचे आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील मुलांचा आरोपींच्या मदतीने शोध घ्यायचा आहे. पार्टीला आलेल्यांमध्ये कोणाचा अंमली पदार्थ पुरवठ्यामध्ये सक्रिय सहभाग आहे, याचा तपास करायचा आहे. पार्टीच्या आयोजनात कोणाचा वरदहस्त आहे का? याची चौकशी करण्यात येत आहे. गुन्ह्याची व्याप्ती व गांभीर्य मोठ्या स्वरूपाचे असून अटक आरोपींकडे सखोल तपास करणे आवश्यक आहे. त्यामुळे आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील प्रियांका वेंगुर्लेकर यांनी केली. आरोपींच्यावतीने जी. एन. अहिवळे, राजेश कातोरे, विक्रम नेवसे, मनीष पडेकर आणि तौसिफ शेख यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटिया यांनी आरोपींना शनिवारपर्यंत (ता. २९) पोलीस कोठडी सुनावली.

सहा वेटरही पोलीस कोठडीत

दरम्यान, पोलिसांपाठोपाठ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानेही रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ‘एल-३’ बारमध्ये छापा टाकून सव्वातीन लाख रुपयांचा बेकायदा मद्यसाठा जप्त केला; तसेच सहा वेटरना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले. या सहा आरोपींनाही न्यायालयाने २९ जूनपर्यंत उत्पादन शुल्क विभागाच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

मोहित राजेश शर्मा (वय २९, मूळ रा. सेमरा रोवा, मध्य प्रदेश), अमीर असफ अली हुसैन (वय २७, मूळ रा. नागाव, आसाम), सौरव शेखर बिसवास (वय २५, मूळ रा. २४ परगणा, पश्चिम बंगाल), खैरूल इस्लाम समसुलहक (वय २२, मूळ रा. होजाई, आसाम), कोहिमुद्दीन इलाम शेख (वय ३०, मूळ रा. नाडिया, पश्चिम बंगाल) आणि नरूल इस्लाम ताहिरुद्दीन (वय २२, मूळ रा. नागाव, आसाम, सर्व सध्या रा. शिवाजीनगर) अशी कोठडी झालेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ‘एल-३’ बारमध्ये झालेल्या वादग्रस्त पार्टीतील ग्राहकांना या आरोपींनी बेकायदा मद्य ‘सर्व्ह’ केले होते. त्यांची चौकशी करून अन्य आरोपींनाही अटक करायची आहे, असे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले.

पुणे ड्रग्जप्रकरणी ४ पोलीस निलंबित; ९ जणांवर गुन्हा दाखल, ८ आरोपींना अटक
काय चाललंय पुण्यात? ड्रग्ज पार्टीप्रकरणी ५ जण ताब्यात

आरोपींची २९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

दरम्यान, एलएलएलच्या शौचालयात काही तरुणांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या बारचे मालक, बार चालविणारे आणि व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून त्यांना २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in