लोकसभेत ४०० की २०० हे जनताच ठरवेल; सतेज पाटील : भाजप विरुद्ध जनतेमध्येच सामना

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना सोबत घ्या अशा सूचना वारंवार वरिष्ठांना केल्या आहेत.
लोकसभेत ४०० की २०० हे जनताच ठरवेल; सतेज पाटील : भाजप विरुद्ध जनतेमध्येच सामना

कोल्हापूर : भाजपचा आत्मविश्वास गेला आहे. त्यांच्याकडे बहुमत आहे तर पक्ष फोडण्याची वेळ का येते ? असा सवाल करत येणारी लोकसभा निवडणूक भाजप विरुध्द जनता अशी होणार असल्याने भाजप ४०० की २०० जागा पार करणार हे जनताच ठरवेल, या शब्दांत काँग्रेसचे विधिमंडळातील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी भाजपच्या ' अब की बार ४०० पार' या घोषणेची हवाच काढून घेतली.

कोल्हापुरातील काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर सचिन चव्हाण, यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी एकत्रित सत्यशोधक चित्रपट पाहिला. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आ. सतेज पाटील म्हणाले, भाजपची प्रतिमा चांगली आहे तर नऊ वर्षे केलेल्या कामांवरच त्यांनी निवडणूक लढवली पाहिजे. मात्र, त्यांचा आत्मविश्वास गेल्याने पक्ष फोडफोडा करत आहेत.

भाजपकडून शिंदे कुटुंबाला टार्गेट

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भाजपने दिलेल्या ऑफरवर आ.पाटील म्हणाले, शिंदे कुटुंबीय गेल्या ५० वर्षांपासून काँग्रेसची एकनिष्ठ आहे. या ऑफरवर सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, भाजपकडून त्यांना टार्गेट केले जात आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. काँग्रेस एकसंघ आहे आणि ती पुढेही एकसंघ राहील.

राजू शेट्टी सोबत हवेत

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना सोबत घ्या अशा सूचना वारंवार वरिष्ठांना केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत काही दिवसात चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास आ.पाटील यांनी व्यक्त केला. शेट्टी यांच्याशी बोलणे होत असून त्यांना महाविकास आघाडी सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरूच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in