
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. आजच्या इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरमध्ये कॉपीची ४२ प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक २६ गैरप्रकार समोर आले आहेत.
राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मंगळवारी सकाळच्या सत्रात इंग्रजी विषयात ४२ कॉपीची प्रकरणे समोर आली.
यामध्ये मुंबई, कोल्हापूर, कोकण विभागात एकही प्रकरण समोर आले नाही. तर लातूरमध्ये १, नागपूर, अमरावती विभागात २, तर नाशिक विभागात ३ प्रकरणे आणि सर्वाधिक २६ प्रकरणे छत्रपती संभाजीनगर विभागात समोर आली आहेत.
मला बाबांचे स्वप्न पूर्ण करायचेय-वैभवी देशमुख
आधी बारावीची परीक्षा देण्याची माझी मानसिकताच नव्हती. ही अशी पहिली परीक्षा आहे, जेव्हा बाबा माझ्यासोबत नव्हते. प्रत्येक क्षण वडिलांची आठवण येते. पण, बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे असल्याने मीही परीक्षेची तयारी केली. त्यामुळे सर्व दु:ख बाजूला सारून बारावीचा पहिला पेपर दिला आणि मानसिकता नसली तरी यापुढील सर्व पेपर चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे मृत संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख यांनी म्हटले आहे.
जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढत राहणार, अशी ठाम भूमिका देशमुख यांनी घेतली आहे. एकीकडे वडिलांची झालेली हत्या, न्याय मिळण्यासाठी करावा लागणारा मोठा संघर्ष आणि बारावीच्या परीक्षेचा एक महत्त्वाचा टप्पा या तारेवरची कसरत करून देशमुख बारावीच्या परीक्षेला सामोऱ्या जात आहेत.