वाळूज येथे रंगणार ४४वे मराठवाडा साहित्य संमेलन; दोन दिवस साहित्य रसिकांना भरगच्च साहित्य मेजवानी

विजय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दगडोजीराव देशमुख महाविद्यालय (रौप्य महोत्सवी वर्ष २०२५) तर्फे मराठवाडा साहित्य परिषदेच्या ४४ वे मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन दि. १५ व १६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.
वाळूज येथे रंगणार ४४वे मराठवाडा साहित्य संमेलन; दोन दिवस साहित्य रसिकांना भरगच्च साहित्य मेजवानी
Published on

सुजीत ताजणे/छत्रपती संभाजीनगर

विजय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दगडोजीराव देशमुख महाविद्यालय (रौप्य महोत्सवी वर्ष २०२५) तर्फे मराठवाडा साहित्य परिषदेच्या ४४ वे मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन वाळूज येथील विलासराव देशमुख साहित्यनगरी, दगडोजीराव देशमुख महाविद्यालय बजाजनगर येथे दि. १५ व १६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. संमेलनामध्ये साहित्य रसिकांसाठी विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. भीमराव वाघचौरे हे संमेलनाध्यक्ष तर विजय राऊत हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत.

शनिवारी दि. १५ रोजी सकाळी १०.३० ते १.०० या वेळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विचारपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. भीमराव वाघचरि (सुप्रसिद्ध कादंबरीकार) यांच्या प्रमुख उपस्थितीत आ. उदय सामंत यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होईल. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आ. संजय शिरसाट, आ. अतुल सावे, आ. अमित विलासराव देशमुख हे मान्यवर उपस्थित राहतील. उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. समाधान इंगळे हे करतील तर आभार प्राचार्य डॉ. राहुल हजारे हे मानतील. तत्पूर्वी शनिवारी ग्रंथदिंडी काढण्यात येईल. उ‌द्घाटक म्हणून चेतन राऊत (अध्यय, मासिआ) हे असतील. सकाळी १० वाजता डॉ. जगदीश कदम (संमेलनाध्यक्ष, ४३ वे मराठवाडा साहित्य संमेलन, गंगापूर) यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शन उद्‌घाटन होईल.

अशी असेल कार्यक्रमांची रूपरेषा

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विचार व्यासपीठावर ‘सामाजिक अस्वस्थतेमागील खदखद, जातीची की मातीची?' या विषयावर परिसंवाद - १ होईल. यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार व्यासपीठावर 'मराठवाड्यातील साहित्य नवे भान, नव्या वाटा !' या विषयावर परिसंवाद-२ होईल. दुपारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार व्यासपीठावर 'भारतीय संविधान' या विषयावर परिचर्चा होईल. दुपारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार व्यासपीठावर परिसंवाद-३ अंतर्गत 'सामाजिक अधोगतीला संत विचारच तारेल !' या विषयावर परिसंवाद होईल. यानंतर सायंकाळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विचार व्यासपीठावर निमंत्रितांचे कवी संमेलन होईल. रविवारी सकाळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विचार व्यासपीठावर मुलाखत कार्यक्रम होईल. दुपारी समाज, साहित्य आणि चित्रपट व मालिका या विषयावर विशेष संवाद हा कार्यक्रम होईल. यानंतर सकाळी 'मराठी अभिजात झाली.... पण पुढे काय ?' या विषयावर परिसंवाद - ४ हा कार्यक्रम होईल. दुपारी कथाकथन होईल. दुपारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार व्यासपीठावर बालकुमार मेळावा होईल. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संमेलनाचा समारोप समारंभ होईल.

logo
marathi.freepressjournal.in