
औरंगाबाद : राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही सुरूच आहेत. मराठवाड्यात यंदा १ जानेवारी ते ३० जून दरम्यान ४८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहेत. यातील ९२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या या जूनमध्ये झाल्या आहेत, अशी माहिती महसूल खात्याने दिली.
जानेवारीत ६२, फेब्रुवारीत ७४, मार्चमध्ये ७८, एप्रिलमध्ये ८९, मेमध्ये ८८, तर जूनमध्ये ९२ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. ४८३ पैकी १२८ आत्महत्या या बीड जिल्ह्यात घडल्या असून, उस्मानाबादमध्ये ९०, नांदेडमध्ये ८९ आत्महत्या झाल्या आहेत, असे औरंगाबादच्या महसूल विभागाने सांगितले. जूनमध्ये बीडमध्ये ९२ आत्महत्या झाल्या असून, नांदेडमध्ये २४ आत्महत्या झाल्या.
४८३ प्रकरणांपैकी ३०४ आत्महत्या या नुकसानभरपाईसाठी पात्र आहेत, तर ११२ प्रकरणांची चौकशी सुरू असून, ६७ आत्महत्या या नुकसानभरपाईसाठी अपात्र आहेत. आतापर्यंत १० कुटुंबीयांना रोख रक्कम दिली आहे. त्यात ३० हजार ते ७० हजार रकमेचा समावेश आहे. ही रक्कम बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवली आहे.