इमारत कोसळून अमरावतीत ५ ठार

सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय इर्विनमध्ये दाखल करण्यात आले आहे.
इमारत कोसळून अमरावतीत ५ ठार

अमरावती शहरात प्रभात चौक या अतिशय वर्दळीच्या ठिकाणी रविवारी दुपारी दोन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत पाच जण ठार झाले असून, ४ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय इर्विनमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, जखमी रुग्णांची स्थिती फारच गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली. पाच जणांना अग्निशमन विभागाच्या जवानांनी मलब्याखालून बाहेर काढले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि अमरावती महापालिकेचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

अमरावती शहरातील प्रभात टॉकिजजवळील राजेंद्र लॉज या नावाने ओळखली जाणारी आणि जीर्ण झालेली दुमजली इमारत रविवारी दुपारी कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. महापालिकेने सुमारे चार वर्षांपूर्वी ही इमारत जीर्ण झाल्याने संबंधितांना ती पाडण्याची नोटीस बजावली होती. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून ही इमारत पाडण्याचे काम सुरू होते. रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास इमारतीचा पहिला माळा अचानक कोसळला.

शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेली दुकाने रविवारी बंद असतात. परंतु, सध्या दिवाळी आटोपली असली तरी अजूनही बाजारातील गर्दी ओसरलेली नाही. ते बघता राजदीप एम्पोरियम हे दुकानही सुरू ठेवण्यात आले होते. या ठिकाणी व्यवस्थापक रवी परमार तसेच इतर चार कामगार असे पाच जण काम करत होते. कोणालाही काही कळण्याच्या आत अचानक इमारत कोसळली व पाचही जण मलब्यात गाडले गेले.

घटनास्थळी मोठी गर्दी झाल्याने बचावकार्यात अडथळे देखील निर्माण झाले आहेत. खासदार नवनीत राणा यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, मनपा अधिकारी, कर्मचारी, मलब्याखाली दबलेल्यांचे नातेवाईक, परिसरातील व्यावसायिक, विविध राजकीय पक्षांचे नेते व नागरिकांची एकच गर्दी झाली होती. चार महिन्यांत दुसरी इमारत कोसळल्याने प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in