मुंबई : महामार्गांच्या उभारणीबरोबरच ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ’ आता सौरऊर्जा निर्मितीसाठीदेखील ओळखले जाणार आहे. हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या वाशिम येथील कांरजालाड व बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज येथील सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला असून तेथे ५ मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीस प्रारंभ झाला आहे. या सौरऊर्जा निर्मितीमुळे समृद्धी महामार्ग हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच पथदर्शी प्रकल्प ठरला आहे.
नागपूर व मुंबईला जोडणारा हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या ७०१ किलोमीटर लांबीच्या द्रुतगती मार्गावरुन आतापर्यंत सव्वा दोन कोटीहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे. समृद्धी महामार्गाच्या आखणीपासूनच वेगवान प्रवासाबरोबर येथे सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट महामंडळाने आखले होते. समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजवर २०४ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा आराखडा निश्चित करण्यात आला असून त्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत.
पहिल्या टप्प्यात समृद्धी महामार्गावरील वाशिम येथील तालुका कांरजालाड व बुलढाण्यातील तालुका मेहकर येथे सौरऊर्जा प्रकल्पाची स्थापित क्षमता ९ मेगावॅट आहे. त्यापैकी कांरजालाड येथील ३ मेगावॅट व मेहकर येथील प्रकल्पातून २ मेगावॅट वीजनिर्मितीस सोमवारी प्रारंभ झाला. सौरऊर्जा निमितीच्या माध्यमातून महामंडळाला पथकराव्यतिरिक्त उत्पन्नाचा नवीन स्त्रोत उपलब्ध झाला आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांची विशेष उद्देश वाहन कंपनी ‘महासमृद्धी रिन्युएब्ल एनर्जी लि.’ व ‘महावितरण’ यांच्यादरम्यान सन २०२२ मध्ये झालेला करारान्वये या विजेची विक्री करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना १ अंतर्गत निविदा प्रक्रियेत भाग घेत महामंडळाने प्रति युनिट रुपये ३.०५ पैसे दर दिला होता.
महामंडळाला कार्बन क्रेडिटही मिळणार
"महामंडळांच्या वाटचालीत हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. केवळ समृद्धी महामार्गाच नाही तर इतर प्रस्तावित महामार्गाच्या इंटरचेजवर सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा विचार आहे. सौरऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून कार्बन क्रेडिट हे देखील महामंडळांच्या खात्यात जमा होणार असून हा लाभ पायाभूत प्रकल्पासाठी कर्ज घेण्यासाठी होईल" असे महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदाल यांनी संगितले.