महायुतीला ५ जागा? राजकीय उलथापालथीमुळे मविआ २ जागा गमावणार!

मतांची फाटाफूट झाल्यास एखादी जागा अतिरिक्त मिळू शकते. परंतु सध्याची स्थिती पाहता महाविकास आघाडीला २ जागांवर पाणी सोडावे लागू शकते.
महायुतीला ५ जागा? राजकीय उलथापालथीमुळे मविआ २ जागा गमावणार!

राजा माने/मुंबई

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ जागांचा समावेश आहे. ६ पैकी ३ जागा भाजपच्या आहेत, तर ३ जागांवर महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार आहेत. दरम्यान, गेल्या दीड वर्षांत राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे आता ६ पैकी ५ जागा महायुतीच्या वाट्याला जाऊ शकतात. त्यामुळे महाविकास आघाडीला एका जागेवरच समाधान मानावे लागू शकते. यात मतांची फाटाफूट झाल्यास एखादी जागा अतिरिक्त मिळू शकते. परंतु सध्याची स्थिती पाहता महाविकास आघाडीला २ जागांवर पाणी सोडावे लागू शकते.

महाराष्ट्रातील माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि व्ही. मुरलीधरण हे भाजपचे विद्यमान राज्यसभा खासदार आहेत, तर शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण आणि काँग्रेसचे कुमार केतकर या ६ खासदारांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे राज्यातील या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे भाजपच्या प्रकाश जावडेकर आणि नारायण राणेंऐवजी अन्य उमेदवारांची चाचपणी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीत पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

त्यामुळे राणे यांना पुन्हा उमेदवारी देणार की लोकसभेच्या मैदानात उतरविणार, हे उमेदवारी घोषित केल्यावरच समजणार आहे. सध्या तरी भाजपमध्ये तीन नव्या चेहऱ्यांची चर्चा सुरू आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याने आणि जास्तीत जास्त आमदार सत्ताधारी गटात गेल्याने शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाची अडचण झाली आहे. सध्या या दोन्ही गटाचे एक-एक विद्यमान खासदार आहेत. त्यांचे सख्याबळ पाहता या दोन्ही गटांना राज्यसभेच्या खासदारकीवर पाणी सोडावे लागू शकते. ठाकरे गटाचे अनिल देसाई आणि शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण या विद्यमान खासदार आहेत. या दोन्ही गटांना या दोन जागा गमवाव्या लागू शकतात. याचा फायदा शिंदे गट आणि अजित पवार गटाला होऊ शकतो. त्यामुळे आता ते कोण उमेदवार देऊ शकतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. ५ पैकी ३ जागा भाजपकडे, तर दोन जागा प्रत्येकी शिंदे गट आणि अजित पवार गटाला मिळू शकते आणि काँग्रेसची जागा कायम राहू शकते. त्यामुळे काँग्रेस पुन्हा कुमार केतकर यांना उमेदवारी देते की अन्य कोण उमेदवार ठरतो, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. परंतु आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन उमेदवारीचे समीकरण जुळवले जाऊ शकते, असे बोलले जात आहे.

व्हीपवरूनही कोंडी?

शिवसेनेत उभी फूट पडल्याने खरी शिवसेना कोणाची, यावरून केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी मूळ शिवसेना शिंदे गटाची असल्याचा निर्वाळा दिला. एवढेच नव्हे, तर व्हीपदेखील शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंचाच वैध ठरवला. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत जर गोगावले यांनी व्हीप बजावला आणि तोच व्हीप वैध असेल, तर यावरूनदेखील ठाकरे गटाच्या आमदारांची कोंडी होऊ शकते. यासोबतच राष्ट्रवादीतही फूट पडली आहे. याच नियमानुसार अजित पवार गटाकडे राष्ट्रवादीची मालकी गेल्यास त्यांच्याच गटाचा व्हीप कायम राहू शकतो, याचा फटका शरद पवार गटालाही बसण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in