'गुगल मॅप'मुळे चुकले; ५० विद्यार्थी UPSC च्या परीक्षेला मुकले; परीक्षा सेंटरपासून १५ किमी दूरचे लोकेशन

देशभरात रविवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पार पडल्या. संभाजीनगरमध्ये देखील मराठवाड्यातून अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी दाखल झाले होते.
'गुगल मॅप'मुळे चुकले; ५० विद्यार्थी UPSC च्या परीक्षेला मुकले; परीक्षा सेंटरपासून १५ किमी दूरचे लोकेशन
प्रातिनिधिक फोटो

छत्रपती संभाजीनगर : देशभरात रविवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पार पडल्या. संभाजीनगरमध्ये देखील मराठवाड्यातून अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी दाखल झाले होते. मात्र गुगल मॅपमध्ये त्यांचे परीक्षा सेंटर दुसऱ्याच ठिकाणी दाखवत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या केंद्रावर पोहोचण्यासाठी एक-दोन मिनिटांचा उशीर झाला, त्यामुळे जवळपास ५० विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागले. यामुळे विद्यार्थी तसेच पालकांमध्ये नाराजी पसरली आहे.

यूपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी संभाजीनगरमध्ये दाखल झाले होते. मात्र गुगल मॅपच्या आधारे परीक्षेचे सेंटर शोधणाऱ्या अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना परीक्षेला मुकावे लागले आहे. विवेकानंद कॉलेजचा पत्ता प्रत्यक्ष ठिकाणापासून गुगल मॅपवर १५ किमी दूर अंतरावर दाखवला जात असल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळेत पोहोचता आले नाही.

परीक्षेसाठी जे सेंटर देण्यात आले ते कॉलेज गुगल मॅपवर दाखवत नाही. आताही लोकेशनबाबत अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले. मुले अभ्यास करून केवळं गुगल मॅप किंवा प्रशासनाच्या छोट्या मोठ्या चुकांमुळे परीक्षेपासून वंचित राहिले. बाहेर गावाहून येणाऱ्यांना शहर माहिती नसते. गुगल मॅपवर मोठ्या प्रमाणात विश्वास असल्यामुळे मॅपमध्ये जो मार्ग दाखवला जातो त्याच मार्गाने जाणे कोणी पसंत करत असतो. मात्र यावेळी विद्यार्थ्यांना गुगल मॅपमुळे मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले. गुगल मॅपच्या लोकशननुसार त्या ठिकाणी गेल्यानंतर ते सेंटर नसल्याचे अनेक विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. जवळपास ५० विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावे लागल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

दोन मिनिटांचा वेळ झाल्याने प्रवेश नाकारला

जालन्यावरून आलेल्या विद्यार्थ्याने परीक्षेला येताना कसा गोंधळ झाला याची माहिती दिली. जालन्यावरून निघताना परीक्षा केंद्राचा पत्ता गुगलवर शोधला. विवेकानंद आर्ट्स, सरदार दलीप सिंग कॉमर्स ॲंड सायन्स कॉलेज, समर्थनगर संभाजीनगर असा पत्ता होता. गुगलला टाकल्यानंतर इथून २० किमी लांब वडगाव एमआयडीसीतले लोकेशन दाखवण्यात आले. तिथे पावणे नऊला पोहोचल्यावर पत्ता चुकल्याचे कळले. तिथून पुन्हा कॉलेजवर आलो, मला दोन मिनिटं वेळ झाल्याने प्रवेश नाकारला.

logo
marathi.freepressjournal.in