तुळजा भवानीच्या चरणी ५४ कोटींचे दान

दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी
तुळजा भवानीच्या चरणी ५४ कोटींचे दान

उस्मानाबाद : राज्यात प्रसिद्ध असलेल्या तुळजापूरच्या तुळजा भवानी देवीच्या चरणी भाविकांनी २०२२-२३ या वर्षात ५४ कोटी रुपयांचे दान केले आहे. २०२१-२२ मध्ये भाविकांनी २९ कोटी रुपयांचे दान केले होते.

मंदिर प्रशासनाने सांगितले की, ५४ कोटी रुपयांपैकी १५ कोटी रुपये हे ‘पैसे घेऊन दर्शन’ या तत्त्वावर मिळाले, तर १९ कोटी रुपये भाविकांनी दान केले, असे उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बसे यांनी केले. ते मंदिर समितीचे अध्यक्ष आहेत.

तुळजा भवानीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी असते. मंदिराचे उत्पन्न वाढल्याने मंदिरात येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा पुरवल्या जातात. अनेकजण पैसे देऊन दर्शनाची सुविधा घेत आहेत. ५०० रुपये दिल्यास तात्काळ दर्शन होते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

२००९ ते २०२२ दरम्यान मंदिराला २०७ किलो सोने व २५७० किलो चांदी भेट म्हणून मिळाले. २०७ किलो सोने वितळवल्यानंतर १११ किलो २४ कॅरटचे शुद्ध सोने मिळाले. बाजारात त्याची किंमत ६५ कोटी रुपये आहे.

२००९ पूर्वी मंदिराला ४७ किलो शुद्ध सोने मिळाले होते. हे सोने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ठेवले असून, त्यावर व्याज मिळत आहे.
भारतीय पुरातत्त्व विभागाची परवानगी घेऊन तुळजापुरात पर्यटनाला चालना देण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल. या प्लॅननुसार, मंदिराच्या काही भागाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. तसेच गार्डन, माहिती देणारे म्युझियम व अन्य सुविधा दिल्या जातील, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in