कल्याण रेल्वे स्टेशनवर बेवारस बॅगेत सापडले ५४ डिटोनेटर, परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला

कल्याण रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी एका बेवारस बॅगेमध्ये ५४ डिटोनेटर (स्फोटके) सापडल्याने खळबळ उडाली.
कल्याण रेल्वे स्टेशनवर बेवारस बॅगेत सापडले ५४ डिटोनेटर, परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला
Published on

डोंबिवली : कल्याण रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी एका बेवारस बॅगेमध्ये ५४ डिटोनेटर (स्फोटके) सापडल्याने खळबळ उडाली. बुधवारी दुपारच्या दरम्यान घडलेल्या या घटनेने स्टेशन परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.

कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक-१ च्या बाहेरील बाजूस बुधवारी दुपारी एका सफाई कामगाराने संशयित बॉक्स असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर दोन्ही बॉक्सची तपासणी केली असता, एक-दोन नव्हे तर तब्बल ५४ डिटोनेटर सापडले आहेत. दोन बॉक्समध्ये भरलेली ही स्फोटके कल्याण रेल्वे स्थानक पोलिसांनी जप्त केली आहेत.

घटनास्थळी कल्याण लोहमार्ग पोलीस व बॉम्बशोधक पथक दाखल झाले. या बॅगची बॉम्बशोधक पथकाच्या श्वानांकडून तपासणी करण्यात आली. हे डिटोनेटर खदानी आणि विहिरीत ब्लास्टिंग करण्यासाठी वापरले जातात. यासंदर्भात माहिती देताना डीसीपी मनोज पाटील यांनी सांगितले की, डिटोनेटरसोबत स्फोट होण्यासाठी स्फोटके आवश्यक असतात. मात्र आम्हाला फक्त डिटोनेटर सापडले आहेत, जे धोकादायक नाहीत. रेल्वे पोलीस, बॉम्बशोधक पथक आणि कल्याण डीसीपी हे या घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे आता ही स्फोटके कल्याण रेल्वे स्थानकात कशी आली? ती नेमकी कोणी आणली आणि त्यामागे नेमका काय उद्देश होता? या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्याचे आव्हान कल्याण लोहमार्ग पोलिसांसमोर असणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in