कांदा पिकाचे ६०० कोटींचे नुकसान

कांदा पिकाचे ६०० कोटींचे नुकसान

मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला नुकसानीचा आढावा

लासलगाव : राज्यात रविवारी झालेल्या गारपीट आणि वादळी पावसाने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान केले आहे, तर या पावसाचा भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला आहे. केवळ लासलगाव परिसरातील कांदा उत्पादकांचे जवळपास ६०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, अवकाळी पावसाचा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रालाही फटका बसला आहे. त्यामुळे विशेषत: भाजीपाला उत्पादक आणि द्राक्ष बागायतदारांना याचा फटका बसला आहे.

कांद्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगावसह परिसरातील विंचूर, धरणगाव, रुई, कोटमगाव, थेटाळे, वनसगाव, वेळापूर, पाचोरे बुद्रक, पाचोरे खुर्द, मरळगोई खुर्द, मरळगोई बुद्रकसह इतर गावात रविवारच्या पावसाने कांद्याचे पीक उद‌्ध्वस्त झाले आहे. खरीपाचा लाल कांदा व उन्हाळ कांद्याची रोपे खराब होऊन अंदाजे पाचशे ते सहाशे कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज ललित दरेकर यांनी व्यक्त केला. गेल्या हंगामात उशिरा आणि अल्प पाऊस झाल्याने खरीप लाल कांद्याची लागवड उशिरा झाली. त्यामुळे कांद्याची संपूर्ण मदार जुन्या साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्यावर असल्याने देशासह परदेशात मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा घटला. पर्यायाने कांद्याचे सरासरी दर तीन ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत स्थिर झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी खरीप कांद्याची लागवड केली. कांद्याचे पीकही जोमदार आले, पण रविवारी झालेल्या गारपीट व वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने संपूर्ण कांद्याचे पीकच उद‌्ध्वस्त झाले.

त्यामुळे पुढील उन्हाळ कांद्याचे लागवड क्षेत्र घटणार असल्याने कांद्याचे चढे भाव राहणार आहेत. लासलगाव-विंचूर रोडवरील साई बाबा ट्रेडर्सची कांद्याची चाळ जमीनदोस्त झाली असून यात साचवलेला ४०० ते ५०० क्विंटल २० ते २५ लाख रुपये मूल्याचा कांदा भिजल्याने कांदा व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे.

मराठवाड्यात अतिवृष्टी, एक ठार

दरम्यान, मराठवाडा विभागात १०७ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून हिंगोलीत वीज अंगावर पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळपर्यंत विभागात ४०.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मराठवाड्याला दोन दिवस अवकाळी पावसाने झोडपले असून पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ज्वारी, हरभरा, गहू या रब्बी पिकांसह तूर आणि कापूस या खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात सहा जिल्ह्यात पावसाचा अधिक जोर होता. छत्रपती संभाजीनगर (६०.८ मिमी), जालना (७०.७ मिमी), परभणी (६५) आणि हिंगोली (६५.८मिमी) अशी अतिवृष्टी झाली आहे.

तातडीने पंचनामे करा -दादाजी भुसे

नाशिक जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. यामुळे द्राक्ष पिकासह कांदा, ऊस, टोमॅटो, फळबागा, पालेभाज्या आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा जिल्ह्याचे पालक मंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

भुजबळांनी घेतला आढावा

नाशिक जिल्ह्यात रविवारी विविध भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. यामुळे द्राक्ष पिकासह कांदा, टोमॅटो, फळबागा, पालेभाज्या आदी पिकांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावे, असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दिले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in