

मुंबई : राज्यात १ जून ते ८ जुलै २०२६ या कालावधीत अतिवृष्टी आणि पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये ६३ जणांचा मृत्यू झाला असून ७८ जण जखमी झाले आहेत. मृतांच्या वारसांना निकषानुसार प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी विधानसभेत अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाच्या जयंत पाटील यांनी राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला उत्तर देताना महाजन यांनी आतापर्यंत वीज पडून २३, दरड कोसळून ६, पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने ३, झाड उन्मळून ६ आणि भिंत कोसळून २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २०० जनावरांचा मृत्यू झाला असून १० जनावरे जखमी झाली आहेत, अशी माहिती दिली.
सरकारने आपत्ती व्यवस्थापनात कसूर केलेली नाही. मी विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहे. राज्यावर संकट आले असताना सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे.