समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात ७ ठार: ३ जण जखमी, दोन गाड्यांची टक्कर; मृतांमध्ये मुंबईतील तीन जणांचा समावेश

शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमाराला कडवंची गावाजवळ हा अपघात घडला. या अपघातात ठार झालेले मुंबईतील मालाड (पूर्व) आणि बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी होते.
समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात ७ ठार:  ३ जण जखमी, दोन गाड्यांची टक्कर; मृतांमध्ये मुंबईतील तीन जणांचा समावेश
Published on

जालना : समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र अद्यापही सुरू असून शुक्रवारी रात्री मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर जालना जिल्ह्यात दोन गाड्यांची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये सात जण ठार झाले, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याचे शनिवारी पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमाराला कडवंची गावाजवळ हा अपघात घडला. या अपघातात ठार झालेले मुंबईतील मालाड (पूर्व) आणि बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी होते.

नागपूरहून मुंबईला जाणारी एक एमयूव्ही आणि समोरील बाजूने येणारी एक गाडी यांची समोरासमोर टक्कर झाली त्यामध्ये सहा जण जागीच ठार झाले, तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. या दोन गाड्यांची टक्कर इतकी भीषण होती की महामार्गावरील कठड्याला एमयूव्ही धडकली आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला पडली. अपघाताचे वृत्त कळताच स्थानिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चक्काचूर झालेल्या गाडीत अडकलेल्यांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू केले.

या अपघातामध्ये ठार झालेल्या सहा जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणण्यात आल्याचे जालना येथील शासकीय जिल्हा रुग्णालयातील डॉ. उमेश जाधव यांनी सांगितले. जखमी झालेल्या तीन जणांवर येथे उपचार करण्यात आले, तर गंभीर जखमीला छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात आले असता तेथे त्याचा मृत्यू झाला. जखमींमध्ये मुंबईतील मालाड (पूर्व) येथील तीन जणांचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in