मुंबई : रुग्णवाहिका खरेदीसाठी आधी ३ हजार कोटींच्या निविदा मागवण्यात आल्या. मात्र मित्र कंत्राटदाराला कंत्राट देण्यासाठी ३ हजार कोटींच्या निविदा रद्द करत १० हजार कोटींची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यामुळे रुग्णवाहिका खरेदीत ७ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी सभागृहात केला. तसेच निविदा उघडण्याची मुदत २१ दिवसांची असताना १० दिवसांत निविदा उघडण्यात आली, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
राज्याच्या अर्थसंकल्पावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान वडेट्टीवार यांनी हा आरोप केला. दरम्यान, वडेट्टीवार यांच्या आरोपाचे खंडन करत अद्याप करार झालेला नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे आता यावर भाषण करणे योग्य नाही, असे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले.
रुग्णवाहिकेचे कंत्राट संपुष्टात आल्यानंतर नवीन कंत्राटासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. आधीचे कंत्राट पाच वर्षांचे होते, मात्र आता १० वर्षांचे कंत्राट देण्यात येणार आहे. नवीन निविदा प्रक्रियेला सनदी अधिकाऱ्यांनी विरोध केला तर त्यांची बदली करण्यात आली. एकूण ३ हजार कोटींच्या निविदा प्रक्रिया मागवण्यात आली असताना, नव्याने १० हजार कोटींच्या निविदा मागवण्याची गरज काय, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
रुग्णवाहिकाचे कंत्राट याआधी देण्यात आले, त्यावेळी महिन्याला ३३ कोटींचा खर्च होता, परंतु नवीन कंत्राट दिल्यास, महिना ६५ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहे. त्यामुळे कंत्राटदाराला वर्षाला ८०० कोटी रुपये मोजावे लागणार आहे. विशेष म्हणजे कंत्राटात नमूद केले आहे की, दरवर्षी ८ टक्के वाढ देण्यात येणार आहे. आमच्या सरकारच्या काळात निविदा प्रक्रिया ४१ दिवस राबवली जात असे, पण महायुतीच्या सरकारने ही मुदत १० दिवस केली आहे. त्यामुळे रुग्णवाहिका खरेदी हा मित्र कंत्राटदाराला कंत्राट देण्यासाठी असून यात घोटाळा झाल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
कुठलाही घोटाळा नाही, करारावर स्वाक्षरी झालेली नाही -तानाजी सावंत
प्रकरण न्यायप्रविष्ट, भाष्य करणे योग्य नाही -आरोग्य मंत्री