कातकरी समाजातील ७० कुटुंबांना हक्काची घरे; रवींद्र चव्हाण यांची माहिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या ७० भटक्या कुटुंबीयांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ओस गावातील स्वतःची जमीन देण्याचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या ७० भटक्या कुटुंबीयांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ओस गावातील स्वतःची जमीन देण्याचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतला आहे. यासाठी जागा निश्चित केली असून लवकरच हक्काचे घर त्यांना मिळणार, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा नियोजन सभागृहात रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जनतादरबार झाला. या कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. सार्वजनिक बांधकाम हायवे आणि पाटबंधारे विभागातील सर्व ९ अर्जांचे निरसन केले असून पोलीस प्रशासनाचे दोन्ही अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. ग्रामविकास विभागांतर्गत सर्व १६ अर्जांची पूर्तता झाली असून कृषी व आरोग्य विभाग ५, मध्यम पाटबंधारे आणि नियोजन विभाग ३, समाज कल्याण विभाग २, नगर विकास खारभूमी विभाग ६ असे विभागनिहाय अर्ज निकाली काढल्याचे मंत्री चव्हाण म्हणाले. उर्वरित अर्जांवर लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

१० हजार जणांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट

मुख्यमंत्री युवा कार्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९ हजार ८५९ युवक-युवतींना रोजगार देण्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत १ हजार उमेदवारांना विविध विभागांत रोजगार देण्यात आला आहे. उर्वरित उमेदवारांना रोजगार देण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाकडील रोजगारविषयक उपक्रमांची माहिती द्यावी, असे निर्देश चव्हाण यांनी दिले. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत गाव पातळीवर घराघरात पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचविण्यात येत असल्याचे चव्हाण म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in