बीसीजी लस घेण्यासाठी ७८ हजार लाभार्थी पात्र, नांदेड महापालिकेचे क्षयमुक्तीसाठी सर्वेक्षण पूर्ण

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत ६० वर्षांवरील सर्व प्रौढांचे व १८ वर्षावरील जोखमीच्या गटातील लोकांच्या बीसीजी लसीकरणासाठी महापालिकेच्या वतीने साडेपाच लाख लोकांच्या घरोघरी जाऊन आशा सेविकांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले.
बीसीजी लस घेण्यासाठी ७८ हजार लाभार्थी पात्र, नांदेड महापालिकेचे क्षयमुक्तीसाठी सर्वेक्षण पूर्ण
nwcmc.gov.in
Published on

नांदेड : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत ६० वर्षांवरील सर्व प्रौढांचे व १८ वर्षावरील जोखमीच्या गटातील लोकांच्या बीसीजी लसीकरणासाठी महापालिकेच्या वतीने साडेपाच लाख लोकांच्या घरोघरी जाऊन आशा सेविकांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. यात ७८ हजार लाभार्थी पात्र ठरले असून, १३ हजार नागरिक लस घेण्यासाठी इच्छुक असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, राज्याच्या आरोग्य विभागाकडून सूचना येताच लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने धोरण निश्चित केले आहे. त्यासाठी क्षयरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून क्षयरोग प्रतिबंधात्मक औषध देण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रौढांना बीसीजी लस देण्यात येणार आहे. त्यासाठी यंत्रणेला सर्वेक्षणाच्या सूचना देण्यात आल्या होत्या. महापालिकेने मागील दोन ते तीन महिन्यात १६० आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत शहरी भागात साडेपाच लाख लोकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण केले आहे. यात ७८ हजार लाभार्थी बीसीजी लस घेण्यासाठी पात्र असल्याची माहिती शहर क्षय अधिकारी मोहम्मद बदयोद्दीन यांनी सांगितले.

असे होणार लसीकरण

यात प्रौढ बीसीजी लसीकरणासाठी ६० वर्षांवरील सर्व प्रौढांना आणि १८ वर्षांवरील जोखमीच्या गटातील म्हणजे, मागील पाच वर्षांतील सर्व क्षयरुग्ण, मागील तीन वर्षातील क्षयरुग्णाच्या सहवासात आलेले कुटुंबातील लोक आणि नागरिक, १८ किलो पेक्षा कमी वजन असलेले, धूम्रपान करणारे (स्वघोषित), मधुमेह असणारे (स्वघोषित) लाभार्थी पात्र आहेत. त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

मोफत निदान व उपचार

१९७८ पासून देशातील सर्व नवजात बालकांनी बीसीजी लस मोफत दिली जाते, बीसीजी लास क्षयरोगाचे गंभीर प्रकार टाळण्यासाठी व लहान मुलांचे क्षयरोगामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी सुरक्षित व प्रभावी लस असल्याचे सिध्द झाले आहे. ठराविक कालावधीनंतर क्षयरोगाच्या लसीमुळे आलेली प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि प्रौढांना क्षयरोगापासून संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे संशोधन करण्यात येत आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत शासन क्षयरुग्णांचे मोफत निदान व उपचार करीत आहे आणि क्षयरोग टाळण्यासाठी अनेक योजना राबवित आहे.

नांदेडमध्ये दीड हजार क्षयरुग्ण

नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागापेक्षा शहरात क्षय (टीबी) रुग्णसंख्या अधिक आहे. मागील वर्षी तीन हजार रुग्ण होते. सध्या दीड हजार क्षयरुग्ण उपचार घेत आहेत. मध्यंतरी औषधींचा तुटवडा निर्माण झाला होता. परंतु, आता मूबलक प्रमाणात औषधांचा पुरवठा असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे त्याचबरोबर लसीकरणासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन देखील पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in